Sun, Sep 20, 2020 10:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावीत कोरोनाचे 25 नवे रुग्ण

धारावीत कोरोनाचे 25 नवे रुग्ण

Last Updated: Jun 03 2020 12:58AM
धारावी : पुढारी वृत्तसेवा

धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या 24 तासांत 25 जणांना लागण झाली आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा मंगळवारी 1 हजार 830 आहे. तर या आजाराने आजवर 71 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत वाढत असलेल्या प्रादुर्भावास ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने संपर्कातून लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाधीतांवर पालिकेच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांच्या कुटुंबाची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. खबरदारी म्हणून अनेक शेजार्‍यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

धारावीत एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असतांना दुसरीकडे माहीम समुद्र किनारपट्टीला लागुनच धारावी खाडी निसर्ग या संभाव्य चक्री वादळाच्या विळख्यात सापडण्याची भीती व्यक्त होत असल्याने येथील रहिवाशांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. किनार्‍यालगत राहणार्‍यांना पालिकेच्या जी उत्तर विभागाकडून धोक्याची सूचना दिली जात आहे. मात्र येथील खाडीलगत राहणार्‍या राजीव गांधी नगर तसेच धारावी कोळीवाड्याचा पालिकेला विसर पडला आहे.

धारावीतून वाहणार्‍या मिठीनदीमुळे खाडीलगत राहणारे हजारो रहिवासी धास्तावले असून कोरोनाच्या संकटात येणार्‍या नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाले आहे.  कोरोनाच्या संसर्गामुळे घराबाहेर पडण्यास घाबरत असलेल्या धारावीतील रहिवाशांना आता दुहेरी आपत्तीचा सामना करण्याची वेळ ओढावली आहे.
 

 "