Sun, Sep 20, 2020 09:28



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत कोरोनाचे बळी १०२६ वर

मुंबईत कोरोनाचे बळी १०२६ वर

Last Updated: May 26 2020 1:31AM




मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत कोरोनाने गेल्या 24 तासांत 38 जणांचा बळी गेल्यामुळे कोरोना बळींची संख्या 1026 वर पोहोचली आहे. सोमवारी कोरोनाच्या 1430 नवीन रुग्णांची भर पडल्याने मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वाढता वेग कायम आहे. मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31,789 झाली आहे. कोरोनामुळे बळी गेलेल्या रुग्णांचा आकडा 1026 वर पोहोचला आहे. 15 दिवसांत कोरोना मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली. 10 ते 25 मे या कालावधीत सुमारे 518 जणांचा बळी गेला. कोरोनाने दिवसभरात मृत पावलेल्या 38 रुग्णांमध्ये 26 पुरुष व 12 महिला आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 52 हजार 667 झाली असून, सोमवारी आणखी 2 हजार 436 नवीन रुग्णांचे निदान झाले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सोमवारी 1186 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 15 हजार 786 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 35 हजार 178 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

दिवसभरात ज्या 1186 रुग्णांना घरी सोडण्यात आले त्यामध्ये सर्वाधिक 900 रुग्ण मुंबई मंडळात सोडण्यात आले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 501, ठाणे 337, पालघर 16, रायगड 46, नाशिक 4, जळगाव, 3, पुणे 109, सोलापूर 2, कोल्हापूर 3, सांगली 3, रत्नागिरी 9, औरंगाबाद 94, जालना 2, हिंगोली 1, लातूर 10, उस्मानाबाद 2, अकोला 17, अमरावती 4 आणि नागपूर 23 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.  

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 52 हजार 667 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 30 हजार 247 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 479 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सोमवारी 60 कोरोनाबाधित रुग्ण दगावले. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ही 1695 झाली आहे. सोमवारी  झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 54 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित 6 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. त्यात मुंबईमध्ये 38, पुण्यात 11, नवी मुंबईत 3, ठाणे  शहरात 2, औरंगाबाद शहरात 2, सोलापुरात 1, कल्याण डोंबिवलीमध्ये 1, रत्नागिरीमध्ये 1 मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. मृत्यूंपैकी 42 पुरुष तर 18 महिला आहेत. 





 







"