बीड : पुढारी ऑनलाईन
राष्ट्रवादीचा बीड जिल्ह्यातील आणखी एक बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहे. शरद पवारांचे खास शिलेदार म्हणून ओळखले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांना आता भाजप सोडून आता सेना प्रवेशाचे वेध लागल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. औरंगाबादमधील शिवसेनेच्या सभेत ते प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांना थांबवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील आहेत. परंतु, त्यांना अद्याप यश आलेले नाही.
पक्षांतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणामुळे गेल्या एक वर्षापासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमांपासून अलिप्त राहिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास करून, मुख्यमंत्र्यांना घरी चहापानासाठी बोलवल्यापासून क्षीरसागर हे भाजपकडे आकर्षित झाल्याचे बोलले जात होते, पण आता सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
बीडमधील राजकारणात क्षीरसागर बंधूंचा मोठा रोल मानला जातो. लोकसभा निवडणुकीचे रणमैदान तापले असताना आ. जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर हे गेल्या महिनाभरापासून राजकीय पटलावरून गायब आहेत. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीच्या एकाही मिटिंगला ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ते परत राष्ट्रवादीचे काम करतील, ही शक्यता धूसर झाली आहे.