Tue, Mar 02, 2021 11:09
मानवतमधील 'त्या' महिलेचा खून पैशाच्या देवाण - घेवाणीवरूनच 

Last Updated: Feb 23 2021 5:48PM

परभणी : पुढारी वृत्तसेवा

मानवतमधील महिलेचा खून हा पैसे देण्या - घेण्याच्या कारणावरून झाल्याचे उघडकीस आले आहे. टेम्पोचालकाने रागाच्या भरात तब्बसूम बडेसाब शेख या महिलेचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. भास्कर सोनाजी गिते (रा.हिवरखेडा ता.औंढा) असे टेम्पो चालकाचे नाव असून त्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 

याबाबत माहिती अशी, मानवत शहरातील गोलाईत नगर जवळील फुले नगर येथील तब्बसूम बडेसाब शेख या महिलेचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा प्रकार रविवारी (दि.२१) रोजी घडला होता. या प्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात मारेकर्‍याविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी आरोपीला शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला निर्देश दिले होते. परंतू या खून प्रकरणात आरोपीने कुठल्याही प्रकारचा धागादोरा न सोडल्याने गुन्हे शाखेसमोर आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. 

या दरम्यानच पोलिसांना मिळालेल्या माहितीनूसार, त्या महिलेच्या घरासमोरील कुटूंबामध्ये नुकताच एक लग्‍नसोहळा झाला होता. वर्‍हाडी मंडळींनी आणलेला टेम्पो हा त्या महिलेच्या घरासमोरच उभा केला होता. त्यावरून पोलिसांनी त्या टेम्पो चालकास ताब्यात घेवून चौकशी केली असता पैशाच्या देवाण - घेवाणीवरून ती महिला व टेम्पोचालक यांच्यात वाद झाला होता. त्यातच रागाच्या भरात टेम्पोचालक भास्कर गिते याने त्या महिलेचा गळा आवळून खून केला असे त्याने स्वतः कबुल केले आहे. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, फौजदार चंद्रकांत पवार, संतोष शिरसेवाड, साईनाथ पुय्यड यांच्यासह गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी हा गुन्हा उघडकीस आणून टेम्पोचालक भास्कर गिते याला अटक केली.