होमपेज › Marathwada › लातुरात क्‍लासचालकाचा गोळी घालून खून

लातुरात क्‍लासचालकाचा गोळी घालून खून

Published On: Jun 25 2018 7:54AM | Last Updated: Jun 25 2018 11:33AMलातूर : प्रतिनिधी

लातुरातील स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री एक वाजता ते घराकडे जात असताना शिवाजी शाळेजवळ त्यांच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी गाडीची काच फुटून एक गोळी त्यांच्या छातीत उजव्या बाजूला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. क्लास वॉरमधून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

अविनाश चव्हाण हे स्टेप बाय स्टेप, एसी व डीसी अशा नावाने चालणार्‍या पाच क्लासेसचे संचालक होते. रात्री काम आटोपून ते घराकडे निघाले होते. हल्लेखोरांनी ही संधी साधली आणि त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. ही घटना शहरातील जुना औसा रोडकडून खाडगाव रोडकडे जाणार्‍या रस्त्यावर शिवाजी शाळेजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड, डीवायएसपी हिंमत जाधव, डीवायएसपी गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सुधाकर बावकर, पीआय केशव लटपटे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी हजर होते.

ही घटना शैक्षणिक क्षेत्रात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मध्यरात्री सर्व शहरात पसरली आणि अनेक जणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या भागात ही हत्या झाली आहे. पोलिस आता पुढील तपास करत आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.