होमपेज › Marathwada › मुलगी दिली नाही म्हणून वडीलांचा खून, पाच जणांवर खूनाचा गुन्हा

मुलगी दिली नाही म्हणून वडिलांचा खून

Published On: Nov 10 2018 1:08PM | Last Updated: Nov 10 2018 4:13PMसेनगाव (जि.हिंगोली) : पुढारी ऑनलाईन

मुलीला लग्नाची मागणी केल्यानंतर मुलगी का दिली नाही, या कारणावरून मुलाच्या कुटुंबियांनी चक्‍क मुलीच्या वडीलाचा खून केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे शुक्रवारी (दि.९) रात्री साडे सातच्या सुमारास घडली. या घटनेने गाव परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सेनगांव पोलिसात शनिवारी (दि.१०) पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सेनगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कैलास माणिकराव शिंदे वय ४५ वर्ष असे मयताचे नाव आहे. सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील सचिन नारायण सुरनर याने गावातील अमोल कैलास शिंदे यांच्या बहिणीस लग्नाची मागणी केली होती. परंतु, सचिन सुरनर हा व्यसनाधीन असल्याने शिंदे कुटुंबियांनी या लग्नाला नकार दिला. या कारणावरून संतापलेल्या सचिन सुरनर यांच्यासह अन्य चार जणांनी कैलास शिंदे यांना गावातील हातपंपाजवळ गाठून तुम्ही आम्हाला मुलगी का दिली नाही अशी विचारणा करित शिंदे यांच्या पोटात गुप्तीने वार केले. यात शिंदे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे सातच्या सुमारास घडली. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी शिंदे यांचे भाऊ भुजंग शिंदे आले असता. त्यांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर पाचही जणांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.सिध्देश्‍वर भोरे, सेनगाव पोलिस ठाण्याचे पोउपनि बाबू जाधव यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.