Sun, Aug 09, 2020 05:54होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांनी चालविली फळबागांवर कुर्‍हाड!

शेतकर्‍यांनी चालविली फळबागांवर कुर्‍हाड!

Published On: Feb 11 2019 1:25AM | Last Updated: Feb 11 2019 1:40AM
हिंगोली : प्रतिनिधी  

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने पीक परिस्थितीच्या 33 टक्के नुकसानीच्या आधारावर मदत जाहीर केेलेली आहे, परंतु या मदतीमध्ये दुष्काळग्रस्त व दुष्काळसदृश भागातील फळबाग उत्पादक शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आलेला नाही. परिणामी शेतकर्‍यांवर आपल्याच हाताने फळबागा नष्ट करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील शेतकर्‍यांनी फळबागांवर कुर्‍हाड चालविल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे.

महिनाभरापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये शेतकर्‍यांना 33 टक्के नुकसानीच्या अनुषंगाने नुकसान भरपाई जाहीर केली. यामध्ये विशेषतः मराठवाड्यातल्या फळबाग उत्पादक शेतकर्‍यांना कुठलाच दिलासा मिळाला नाही. मदतीच्या कक्षेतच येत नसल्यामुळे या शेतकर्‍यांच्या फळबागांचे सर्वेक्षण देखील करण्यात आलेले नाही. ज्याचा परिणाम आर्थिक त्रास सहन करून शेतकर्‍यांना फळबागा तोडण्यात होत आहे. हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील शेतकरी संत्रा फळबागाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवितात. या परिसरातील उत्पादीत झालेले संत्रे हैद्राबाद,बंगलोर, चेन्नई, मुंबई येथील बाजारपेठेत विक्रीकरिता पाठविण्यात येत असत. परंतु गेल्या तीन वर्षात झालेल्या अवर्षण परिस्थितीमुळे फळबागा जगविणे शेतकर्‍यांना कठीण जात आहे. शेतात खोलपर्यंत बोअर घेवूनही पाण्याची उपलब्धतता नाही. परिसरात नवलगव्हाण येथे सिंचन तलाव आहे. परंतु त्यातही पुरेश पाणी नसल्याने फळबागाचे सिंचन होऊ शकत नाही. परिणामी  शेतकर्‍यांनी संत्रा फळबागेवर कुर्‍हाड चालविण्यास सुरूवात केली आहे. भांडेगाव येथील तुकाराम सखाराम जगताप, मारोती संभाजी जगताप, समाधान टापरे या शेतकर्‍यांनी आपल्या फळबागा तोडण्याचे काम सुरू केले आहे. या शेतकर्‍यांकडे प्रत्येकी 300 संत्रा झाडे होती. गेल्या अनेक वर्षांपासून जपलेली झाडे तोडण्याची वेळ आल्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे पाणावले आहेत. परिणामी राज्य शासनाने फळबाग उत्पादक शेतकर्‍यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.