Sat, Aug 08, 2020 14:46होमपेज › Marathwada › ‘पोलिसांनी दखल न घेतल्‍यानेच ऑनर किलिंग घडले’(व्हिडिओ) 

‘पोलिसांनी दखल न घेतल्‍यानेच ऑनर किलिंग’(व्हिडिओ) 

Published On: Dec 20 2018 4:29PM | Last Updated: Dec 20 2018 9:56PM
बीड :  प्रतिनिधी

प्रेमविवाह केल्यामुळे बहिणीच्या पतीचा धारदार शस्त्राने भरदिवसा खून केल्याची घटना बुधवारी बीडमध्ये घडली होती. ऑनर किलिंगच्या या घटनेतील मृत तरुणाची पत्नी भाग्यश्री हिने 24  ऑक्टोबर रोजी बीड शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तिच्या आणि पतीच्या जीवितास धोका असल्याची तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची कसलीही दखल घेतली नाही. पोलिसांनी त्यावेळीच मी दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन आरोपी बालाजी लांडगे याला समज दिली असती तर माझ्या पतीची हत्या झालीच नसती, असा आरोप भाग्यश्रीने केला आहे. 

भाग्यश्री आणि सुमित वाघमारे यांच्या प्रेमविवाहानंतर तिचा भाऊ तथा खून प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे व इतर नातेवाईक त्यांना सतत त्रास देत होते. त्यांच्या दुचाकीला लांडगे याने आपली गाडी धडकवून अपघात घडवण्याचा प्रयत्नही केला होता. या नंतरच तिने पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. उलट ती तक्रार द्यायला गेली तेंव्हा बालाजी लांडगे व त्याचे नातेवाईक अशोक वाघमारे, कृष्णा क्षीरसागर हे पोलिस ठाण्यात बसलेले होते. त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्यामुळेच त्यावेळी माझी तक्रार घेतली नाही, असा आरोप मयत सुमित वाघमारे याची पत्नी भाग्यश्री वाघमारे हिने केला आहे. सुमित शिवाजीराव वाघमारे (वय 25, रा. तालखेड, ह.मु. नागोबा गल्ली, बीड)  असे खून झालेल्याचे नाव आहे. 

सुमित हा शहरातील तेलगाव नाका भागातील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. यादरम्यान त्याच्याच वर्गात शिकणार्‍या भाग्यश्री लांडगे या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, दोघांनी दोन महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केले. त्यांचा हा विवाह  घरच्यांना मान्य नव्हता. बुधवारी परीक्षा असल्याने हे दोघेही कॉलेजमध्ये आले होते. परीक्षा संपवून ते महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच त्याठिकाणी भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे हा आपल्या एका साथीदारासह कारमधून आला. त्या दोघांनी सुमित याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. जखमी अवस्थेत सुमित खाली कोसळताच दोघांनी तेथून पलायन केले. भाग्यश्रीने एका रिक्षाचालकाच्या मदतीने सुमितला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु रक्तस्त्राव अधिक झाल्याने सुमितचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्त

सुमित वाघमारे याचा खून झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांसह मित्रांना कळताच जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.