Sat, Aug 15, 2020 13:06होमपेज › Marathwada › असा घडला ‘विजेता’ राहुल आवारे

असा घडला ‘विजेता’ राहुल आवारे

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMपाटोदा पोहोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका हा तसा मागास, ऊसतोड मजुरांचा, कमी पाणी असलेला, डोंगराळ प्रदेशात वसलेला, गावागावात बेरोजगारांची फ ौज असलेला तालुका अशीच ओळख आजपर्यंत होती. या मागासलेपणाचा शिक्का आज राहुल आवारेच्या विजयाने पुसला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकून राहुल आवाराने देशाचे, महाराष्ट्राचे, बीड जिल्ह्याचे अन् पाटोद्याचे नावही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. अजोड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावरच त्याने हे निर्भेळ यश मिळवले आहे.

पाटोदा/बीड : प्रतिनिधी

पाटोद्याचा भूमिपुत्र व कुस्तीपटू राहुल बाळासाहेब आवारे याने ऑस्ट्रेलिया देशातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या व कुस्ती क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धत सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. पाटोद्याच्या या  लाडक्या  भूमिपुत्राने आता विदेशी मातीवर आपल्या विजयाने मराठी झेंडा रोवला असून त्याच्या या यशोदायी प्रवासाला अत्यंत कठोर मेहनतीची जोड आहे.

मूळ माळेवाडी हे गाव असलेले आवारे कुटुंब हे पाटोद्याला स्थलांतर झाले व तिथेच स्थिरावले, राहुलचे वडील बाळासाहेब आवारे हे त्या काळचे अत्यंत नावाजलेले पैलवान होते, त्यांना मुळातच कुस्तीची आवड असल्याने त्यांनी आपले दोन्हीही मुले राहुल व गोकूळ यांना सुरुवातीपासूनच तालमीची, व्यायामाची सवय लावली, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतं त्यांनी आपली दोन्ही मुलांना याच क्षेत्रा त पुढे जाण्यासाठी कायम प्रोत्साहन दिले, मुळातच अंगात चित्त्याची चपळाई असणार्‍या राहुलने अल्पावधीतच कुस्तीतील डावपेच आत्मसात केले व तो तालमीत आखाड्यात उतरून कुस्ती मारू लागला.

बाळाचे पाय पाळण्यात 
आपले वडील पैलवान बाळासाहेब आवारे यांच्या कडक शिस्तीत व मार्गदशनाखाली राहुलची कुस्ती दिवसेंदिवस बहरत गेली व तो विविध स्पर्धा गाजवू लागला, त्यानंतर येथील भामेश्‍वर विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या राहुलने राज्यस्तरापर्यंत मजल मारली व रांची येथे झालेल्या स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक मिळवत आपली अद्वितीय गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर राहुलने कुस्तीतच करिअर करण्याचा निर्णय घेत ला व त्याने पुणे येथे पै. हरिशचंद्र बिराजदार मामा यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे अनेक डावपेच शिकण्यास सुरुवात केली त्याने राज्यस्तरीय,तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धत यशाची शिखरे पादाक्रांत करत त्याने थेट ऑलिंपिकच्या निवड चाचणीपर्यंत मजल मारली.

परंतु त्या ठिकाणी नेहमीप्रमाणेच महाराष्ट्राला दुजेपणाची वागणूक मिळाली व त्याची ऑलिंपिकची संधी थोडक्यात हुकली होती, परंतु जिगरबाज राहुलने हार न मानता कठोर मेहनत सुरूच ठेवली व आता नुकत्याच ऑस्ट्रेलियात राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पदक जिंकले राहुल हा सध्या पुणे येथील क्रीडा संकुलात पै.वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून आता तो ऑलिंपिक मध्येही नक्कीच विजय मिळवून आपल्या मातीचे व देशाचे नाव संपूर्ण जगात उंच करील असा विश्‍वास प्रत्येक पाटोदेकरांना आहे.

आवारे कुटुंबीयावर शुभेच्छांचा वर्षाव

पाटोद्याचा भूमिपुत्र राहुल आवारे याने ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याच्या पाटोदा येथील घरी आवारे कुटुंबीयावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू झाला असून अनेक राजकीय नेते पदाधिकारीअधिकारी यांनी त्यांच्या घरी प्रचंड गर्दी केली होती.

यामध्ये प्रामुख्यने पाटोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस. जे. माने यांच्यासह पोलिस कर्मचारी तसेच सभापती राजू जाधव, दिलीप, रंधवे गणेश शेवाळे याच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. दूरध्वनी आणि सोशल मीडियावरही शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव सुरू होता.

पाटोदा आणि परिसरात तशी कुस्तीसह रांगड्या खेळांना मोठे महत्त्व आहे. लहानपणापासूनच तालमीत जाणारे, दूध पिणारे अन् कसरत करणारी अनेक पोरं पाटोदा तालुक्यातील गावागावात दिसतात. यातूनच सैन्य दलात, पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर युवक सेवा बजावत आहेत. आता राहुलच्या यशामुळे यात नक्कीच वाढ होणार आहे.

राहुल आवारे याने यापूर्वीही अनेक कुस्ती स्पर्धेत यश मिळवले आहे. त्या त्या वेळी पाटोदाकरांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. आज त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले असून यामुळे त्याचे जिल्हाभरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. त्याची तयारीही कुस्तीप्रेमी आणि त्याच्या मित्रपरिवाराने केली आहे.

महाविद्यालयापासूनच कठोर सराव

राहुल आवारे याचे अकरावी ते एम. ए. पर्यंत शिक्षण पाटोदा येथील पीव्हीपी महाविद्यालयात झाले आहे. यावेळपासूनच राहुल कुस्तीचा कठोर सराव करीत होता. यावेळीही त्याने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळविले होते. यावेळी राहुल यास शिक्षणासाठी शुल्क क्रीडा शिक्षक तानाजी आगळे यांनी अनेकदा दिले. राहुलमध्ये क्रीडा कौशल्य असल्याने तो नक्किच मोठे नाव कमाविल, असा विश्‍वास होता. या विद्यार्थ्याचा अभिमान आहे. 

प्रा. तानाजी आगळे, क्रीडा शिक्षक, पीव्हीपी कॉलेज, पाटोदा.

जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली
राहुलच्या कामगिरीमुळे बीड जिल्हयाची मान अभिमानान उंचावली असल्याचे त्या म्हणाल्या. कुस्तीपटू राहुल आवारे हा बीड जिल्ह्यातील पाटोद्याचा रहिवासी आहे. सिडनी येथे सुरू असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत राहुलने कॅनडाच्या खेळाडूला चीतपट करत सुवर्णपदकाची कमाई केली. राहुल खूप जिद्दीने लढला. महाराष्ट्रा बरोबरच बीड जिल्ह्याची मान त्याने उंचावली, या कामगिरीबद्दल राज्य सरकारकडून त्याला 50 लाख रुपये इनाम मिळणार आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले यश खरोखर कौतुकास्पद आहे.

पंकजा मुंडे, पालकमंत्री, बीड.

राहुल आवारेचा सार्थ अभिमान
बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र, पाटोदा तालुक्यातील रहिवाशी राहुल आवारे याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुलस्पर्धेत सुवर्णपदक जिंकून बीड जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. राहुलच्या या यशाने बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणांचे मनोधैर्य निश्‍चितच वाढणार आहे. आगामी काळात पाटोद्यासह ग्रामीण भागातील तरुणांना कुस्ती, कबड्डी या मैदानी खेळांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याची व्यवस्था शासनाने करायला हवी.

पप्पू कागदे, प्रदेशाध्यक्ष, युवा रिपाइं.