Sun, Sep 20, 2020 09:35होमपेज › Marathwada › बीड : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील ४२ निवासी डॉक्टरांची टीम मुंबईच्या मदतीला रवाना

बीड : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील ४२ निवासी डॉक्टरांची टीम मुंबईच्या मदतीला रवाना

Last Updated: Jun 01 2020 4:46PM
आंबाजोगाई (बीड) : पुढारी वृत्तसेवा 

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर वाढत असल्याने डॉक्टर कमी पडत आहेत, अशा वेळी राज्य शासनाच्या आदेशानुसार अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील ४२ डॉक्टरांची एक टीम ३० मे च्या मध्यरात्री अंबाजोगाई येथून मुंबईला रवाना झाली. काल संध्याकाळी ५ वाजता टीम मुंबईत दाखल झाली. ही टीम पुढचे १५ दिवस सेव्हन हिल रुग्णालयात कोविड रुग्णांच्या सेवेत असेल.

नांदेड : आणखी एका डॉक्टरसह तीन पॉझिटिव्ह! 

मार्चपासून मुंबईत मार्डचे निवास डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, सिपीएस डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टर जीवाची बाजी लावत काम करत आहेत. काही डॉक्टर कॊरोनाग्रस्तही होत आहेत. कॊरोनामुक्त झाल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू होत आहेत. पण त्याचवेळी रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने आता डॉक्टर-नर्सेस कमी पडू लागल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने केरळकडे ५० डॉक्टर आणि १०० नर्स स्टाफची मागणी केली होती. यानंतर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संचालकाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातुन किंही डॉक्टर व परिचारिकांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचे आदेश दिले होते.

वाचा - अकोल्यात २४ तासात २४ नवीन रूग्ण

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातुन मुंबई येथे कोविड रुग्णसेवेसाठी गेलेल्या या ४२ निवासी डॉक्टरांच्या या टीममध्ये १६ विद्यार्थीनीही आहेत. या टीमच्या राहण्याची व्यवस्था ललित हॉटेलमध्ये करण्यात आली असून ते सेव्हन हिल या रुग्णालयात कोवीड रुग्णांना १५ दिवस वैद्यकीय सेवा देणार आहेत.

या वेळी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी "मुंबईतील आमचे मार्डचे डॉक्टर आणि इतर डॉक्टर रात्रंदिवस काम करत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत ते काम करत असून त्यांच्यावर खूप मोठा ताण पडला आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही मुंबई येथे रुग्णसेवा देण्यासाठी चाललो आहोत अशा परिस्थितीत काम करणे, रुग्णसेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही हे कर्तव्य पार पाडत आहोत" अशी प्रतिक्रिया दिली.

निवासी डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग...

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास रुग्णसेवेसाठी मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर डॉक्टर पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर निवासी डॉक्टरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यापैकी १२ निवासी वैद्यकीय मुलींनी स्वतः अर्ज देवून मुंबई येथे रुग्ण सेवेसाठी जाण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. या टीम मध्ये सहभागी झालेल्या ४२ निवासी डॉक्टरांना सर्व प्रकारची दक्षता घेवून काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत असे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले.

 "