होमपेज › Marathwada › परभणी : स्‍वत:च्या केळी फडाचे पाणी बंद करून दिले ग्रामस्‍थांना पाणी 

परभणी : स्‍वत:च्या केळी फडाचे पाणी बंद करून दिले ग्रामस्‍थांना पाणी 

Published On: May 17 2019 11:10AM | Last Updated: May 17 2019 11:00AM
बोरी : प्रतिनिधी

जिंतूर तालुक्यातील शेक येथील सरपंच सुलेमान शेख रहीम यांनी स्वतःच्या केळी फडाचे पाणी बंद करून ते पाणी गावालगतच्या श्रीरामपूर वस्तीतल्या ग्रामस्थांना मोफत देण्यास सुरू केले आहे. ग्रामस्‍थांची पाण्यासाठी होणारी पायपीट पाहून शेख यांनी हा निर्णय घेतला. शेख यांच्या या औदार्यामुळे ग्रामस्‍थांमधून त्‍यांचे कौतूक होत आहे. 

यावर्षीचा उन्हाळा तीव्र झाला आहे. त्‍यातच मान्सूनपूर्व पावसानेही ओढ दिली आहे. त्‍यामुळे शेक व श्रीरामपूर ग्रुप  ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी आटले आहे. त्‍यामुळे श्रीरामपूर येथील  ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत होती. गावातील हात पंप आणि विहिरीही कोरड्या पडल्यामुळे ग्रामस्थांना दोन किमी पायपीठ करून शेतामधून पाणी आणावे लागत होते. ही बाब लक्षात घेता येथील सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी स्वतःच्या शेतातली 3000 केळी झाडाची पाने तोडून हे पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी मोफत वाटप सुरू केले आहे. 

यामुळे ऐन पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्‍थांसाठी शेख सुलेमान शेख रहीम  हे जलदूत म्‍हणून धावून आले आहेत. यामुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या ग्रामस्थांना अशा कडक उन्हाळ्यामध्ये एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गावामध्ये सरपंचांचे सर्वत्र ग्रामस्थ कौतुक करीत आहेत.

टँकर प्रस्ताव धूळखात पडून 

शेक येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावालगतच्या श्रीरामपूर वस्तीत टॅंकरने पाणीपुरवठा करावा अशा प्रकारचा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शेख सुलेमान शेख रहीम यांनी जिंतूर तहसीलदारांकडे दिला आहे. मात्र तो प्रस्ताव धूळ खात पडून आहे. याबाबत तहसीलदारांनी चौकशी करून तातडीने टँकर सुरू करावा. अशी मागणी श्रीरामपूर वस्तीतील ग्रामस्थांनी केली आहे.