Sun, Sep 20, 2020 09:47



होमपेज › Marathwada › वाशिम : आठ दिवसांनी जिल्‍ह्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रूग्‍ण 

वाशिम : आठ दिवसांनी जिल्‍ह्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रूग्‍ण 

Last Updated: Jun 03 2020 2:31PM




 वाशिम : प्रतिनिधी

नवी मुंबई येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल आज (३ जून) रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला. यामुळे मानोरा तालुका प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, भोयणी गाव सील करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली. जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रूग्‍ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रक क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला.

अधिक वाचा :  संकटग्रस्त महाराष्ट्रावर शक्तीशाली 'निसर्ग'ची धडक!

यानंतर त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. मेडशी येथील एक रूग्ण व ट्रक चालकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर १५ मे रोजी मालेगाव येथील एक महिला कोरोनाबाधित असल्याचे आणि १९ मे रोजी या महिलेच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी एका रूग्णाचा २६ मे रोजी मृत्यू झाला, तर उर्वरीत पाच रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. 

अधिक वाचा :  चक्रीवादळात काय करावे अन् काय करु नये? 

दरम्‍यान मुंबईतून परतलेली महिला १९ मे पासून जिल्ह्यात असल्याने मानोरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करून १ जून रोजी तिचा थ्रोट स्वॅब नमुना तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आला होता. याचा अहवाल ३ जून रोजी प्राप्त झाला असून, सदर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेसह मानोरा तालुका प्रशासन अलर्ट झाले.

भोयणी येथे तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण यांच्यासह पोलिस व आरोग्य यंत्रणेने भेट देऊन गाव सील करण्याची कार्यवाही सुरू केली. या महिलेच्या 'हायरिस्क' संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. कोरोनाबाधित रूग्णांचे गावात १४ दिवसांसाठी आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत सर्व्हे केला जाणार आहे. त्या गावाचा परिसर सील केला जाणार असून, ज्या ठिकाणी संबंधित रूग्‍ण वावरला, त्या ठिकाणी हायड्रोक्लोराईड सोल्यूशनची फवारणी केली जाणार आहे. संबंधित गावात कुणी येणार नाही, तसेच गावातून कुणी बाहेर जाणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्‍याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 





 







"