होमपेज › Marathwada › लसीकरण मोहीम वेगात; गैरसमज होणार दूर

लसीकरण मोहीम वेगात; गैरसमज होणार दूर

Published On: Dec 13 2018 1:36AM | Last Updated: Dec 13 2018 12:39AM
बीड : प्रतिनिधी

गोवर - रुबेला लसीकरण माहीम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. 27 नोव्हेंबरपासून प्रारंभ झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 3 लाख बालकांचे लसीकरण करण्यात आलेे. दरम्यानच्या काळात काही शाळांनी लसीकरणापूर्वी पालकांचे नाहरकत पत्र आणण्याविषयी विद्यार्थ्यांना सांगितल्याचे पुढे आले. यावर कोअर कमिटीची बैठक होवून शिक्षण विभागाला सूचना देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी सांगितले. दरम्यान लोकांच्या मनात गैरसमज वाढू लागल्याने खासदार प्रीतम मुंडे यांनी बुधवारी (दि.12) स्वत: आपल्या मुलाला गोवर, रुबेलाची लस दिली.

बीड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना गोवर-रुबेलाचे लसीकरण करण्याची मोहिम सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख मुला-मुलींना ही लस देण्यात आली आहे. लस दिल्यानंतर काहींना त्रास झाला परंतु तो चिंता करण्यासारखा नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच अशा मुलांना निरीक्षणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली आहे. या दरम्यान बीड शहरातील काही  शाळांनी विद्यार्थ्यांना सदरील लस घेण्याबाबत आमची हरकत नाही अशा आशयाच्या पत्रावर पालकांची सही आणण्यास सांगितले. याची गंभीर दखल घेण्यात आली असून कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्षण विभागाला याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच अशा शाळांना आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे पथक भेट देणार असल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले. 

गोवर, रुबेला लसीबाबत गैरसमज पसरत आहे. मात्र ही लस पूर्णपणे सुरक्षित असून लोकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावा यासाठी मी आज माझ्या मुलाला मुंबई येऊन परळी येथे बोलावून गोवर रुबेलाची लस दिली. लसीबाबत पसरत असलेल्या अफ वांवर विश्‍वास ठेवू नये. - डॉ. प्रीतम मुंडे, खासदार, बीड

गोवर-रुबेला लस पूर्णपणे सुरक्षीत आहे. यामुळे कुठलाही त्रास होत नाही. पालकांनी आपल्या पाल्याला ही लस द्यायलाच हवी. उद्दिष्टपूर्तीसाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. - डॉ.आर.बी.पवार, डीएचओ