नेकनूर (बीड) : मनोज गव्हाणे
इंधन दरवाढीमुळे शेतीच्या कामी येणाऱ्या ट्रॅक्टरचे मशागतीची दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी पुन्हा बैलाकडे वळू लागला आहे. नांगरणीचा प्रति एकर दर दोन हजार रुपये झाल्याने तो परवडनारा नाही. यामुळे बाजार बंद असताना खरेदी-विक्रीचा अडसर दूर करीत मोबाईलचा वापर होऊ लागला आहे. सध्या अनेक व्यवहार याद्वारेच सुरू आहेत. इंधन दरवाढीमुळे का होईना, पण पुन्हा एकदा जनावरांचे संगोपन येणाऱ्या काळात वाढेल.
शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर आले तसे बैलांची संख्या कमी झाली अनेक ठिकाणी दावण, गोठे संपुष्टात आले. यामुळे शेतीला उपयुक्त असणारे सेंद्रिय खत नाहीसे झाले. जनावरे कमी झाल्याने शेणखत दुर्मिळ होत चालले असताना रासायनिक खत, इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जुनं ते सोनं म्हणण्याची वेळ आली आहे. त्यादृष्टीने शेतकरी पावले टाकत आहेत.
सध्या रिकाम्या झालेल्या शेतात नांगरट करण्यास प्राधान्यक्रम असतो. मात्र डिझेल ९० रुपयांवर गेल्याने पंधराशे रुपये एकर नांगरट दोन हजारांवर पोहोचली. मोगडनी, पाळी, रोट, पेरणी यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने बैलांचा विचार शेतकऱ्यांना फायदेशीर वाटू लागला आहे. मात्र, खरेदीसाठी बाजार बंदची अडचण असल्याने यावर मात देत आधुनिक व्हॉट्सॲप हे माध्यम उपयोगात आणत खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण केले जात आहेत. चांगली बैल जोडी लाखांच्या घरात आहे. एकाला हे शक्य नसल्यास दोघांमध्ये ते खरेदी केले जात आहेत. मात्र बैलांची संख्या कमी झाल्याने खरेदीसाठी अडचणी आहेत.
ट्रॅक्टर मशागत | दर | - |
पूर्वीचे दर | सद्याचे दर | |
नांगरणी | 1500 | 2000 |
पाळी | 800 | 1200 |
मोगडणी | 700 | 900 |
रोटर | 1000 | 1500 |
पेरणी | 700 | 1000 |
इंधन दरवाढीचे कारण पुढे करत ट्रॅक्टरचे दर वाढल्याने मशागतीसाठी हे परवडणारे नाही. कारण उत्पन्न बेभरवशाचे असते. यामुळे बैलांची खरेदी करून मशागत करणार आहे.
- संजय शिंदे, शेतकरी
ट्रॅक्टर आले तसे शेतातील दावण, गोठे, जनावरे संपुष्टात आली. त्यामुळे शेतात शेणखत उरले नाही. रसायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर आजारांचे कारण बनला. याकडे मात्र कोणीच गांभीर्याने पाहत नव्हते. इंधन दरवाढीमुळे का होईना, पुन्हा एकदा जनावरांचे संगोपन वाढेल अशी आशा आहे.