Fri, Aug 14, 2020 16:10होमपेज › Marathwada › अपहृत मुलीची अठ्ठेचाळीस तासांत सुटका

अपहृत मुलीची अठ्ठेचाळीस तासांत सुटका

Published On: May 29 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 11:14PMगेवराई : प्रतिनिधी

तालुक्यातील बेलगाव येथून एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन अनोळखी व्यक्तींनी पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली होती. गेवराई पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत या घटनेचा छडा लावत गंगापूर (जि.औरंगाबाद) तालुक्यातील शेंदूरवाडा येथे आरोपीच्या मुसक्या आवळून पीडित मुलीची     सुटका केली.

वाडीनांदर (ता.पैठण जि.औरंगाबाद) येथील घिसाडी काम करणारे दाम्पत्य उदरनिर्वाहासाठी गेवराई तालुक्यात आले होते. गुरुवारी दि.24 मे रोजी हे कुटुंब तालुक्यातील बेलगाव येथे त्यांचे पाल लावीत होते. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी घिसाडी काम करणारे या दाम्पत्याच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवर बसून पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे गतीमान केली होती. 

असा लावला तपास...

फिर्यादीच्या मोबाइलची पोलिसांनी तपासणी केल्यावर काही मोबाइलधारकांवर पोलिसांना संशय आला. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलिस उपनिरीक्षक सागडे, अंकुश वरपे, संतोष क्षीरसागर, शरद बहिरवाळ, सुशेन पवार आदी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा गाठून  विष्णू भगवान चव्हाण याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याच्या ताब्यातील पीडित मुलीची सुटका केली, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल देखील ताब्यात घेतली. पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत या घटनेचा तपास लावला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागडे हे करीत आहेत.