Sun, Aug 09, 2020 04:54होमपेज › Marathwada › सहा एकरात अंकुरली शिवप्रतिमा 

सहा एकरात अंकुरली शिवप्रतिमा 

Published On: Feb 18 2019 8:20AM | Last Updated: Feb 18 2019 8:20AM
लातूर : शहाजी पवार 

शिवजयंतीचे औचित्य साधून लातूरच्या क्रीडा संकुलावर १ लाख ११ हजार ८४३ स्क्वेअर चौरस फुटात छत्रपती शिवरायांची विश्‍वविक्रमी रांगोळी काढलेल्या अक्का फाउंडेशनने आता निलंगा येथे तब्बल सहा एकरात आळीवाचे बिजारोपण करून शिवछत्रपतीची प्रतिमा साकारली आहे. वृक्ष संगोपन अन पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारी ही पर्यावरणानुकूल शिवप्रतिमा एकमेव असल्याचा दावा फाउंडेशनने केला आहे. 

या प्रतिमेची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. गुगल मॅपवरूनही ही प्रतिमा पाहता येते. 'महाराज फार्मिंग पेंटींग' या नावाने गुगलवर (google) ही प्रतिमा सर्वांधिक सर्च केली जात आहे.  

माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या प्रेरणेतून, अक्का फाऊंडेशनचे अरविंद पाटील यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश निपाणीकर या कलाकाराने ती साकारली आहे. दोन लाख चाळीस हजार स्क्वेअर फुटातील या प्रतिमेसाठी दीड हजार किलो अळिवाचे बीज वापरण्यात आले आहे. निलंगा शहरातील दापका रोडवर एन. डी.  नाईक यांच्या शेतात ही प्रतिमा अंकुरली आहे. 

शिवरायांची ही प्रतिमा साकारण्यापूर्वी  जमीन समतल करण्यात आली. तिची चांगली मशागत करण्यात आली.  त्यानंतर निपाणीकर व त्यांच्या चमूने पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने शिवप्रतिमा काढली व त्यावर हाताने आळीव पेरण्यात आले. अळीव लवकर अंकुरनारी, गतीने वाढणारी, आपल्या रूपाने गर्द हिरव्या रंगाचा शिडकावा करणारी, मनमोहक वनस्पती असल्याने तिचा शिवप्रतिमेसाठी वापर करण्यात आल्याचे मंगेश निपाणीकर म्हणाले. पेरलेल्या बिजास तुषार संचाने पाणी देण्यात आले व अवघ्या पाच  दिवसात त्यातून शिवछत्रपती प्रतिमा रूपात आकाराला आले. 

ही प्रतिमा अधिक देखणी व उठावदार दिसावी याकरिता प्रतिमेच्या पार्श्व बाजूस ५० हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या हस्ते या शिवप्रतिमेचे पूजन होणार असून ती नागरिकांना पाहण्यास उपलब्ध होणार आहे. 

विद्यार्थ्यांना देणार एक लाख सीड पेपर 

वृक्षारोपण व वृक्ष संगोपन हा उद्देश ठेवून शिवजयंती दिनी अक्का फाऊंडेशन विद्यार्थ्यांना  तुळस व वडाच्या बियाचे एक लाख सीड पेपर  वाटणार आहे. तुळस व वटवृक्ष हे भारतीयांना पूजनीय आहेत. विशेष म्हणजे ते मुबलक प्राणवायू देतात त्यामुळे त्यांचे सीड पेपर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे पेपर विद्यार्थी जमिनीत पुरतील, त्यातून लाखो झाडे उगवतील व विद्यार्थी ते जगवतील

अरविंद पाटील निलंगेकर