Tue, Aug 04, 2020 11:41होमपेज › Marathwada › बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी शिक्षकांना अजूनही प्रशिक्षण नाही

बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी शिक्षकांना अजूनही प्रशिक्षण नाही

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 20 2018 10:38PMअंबजोगाई  : प्रतिनिधी 

इयत्ता पहिली व आठवीचा अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून बदलला आहे. अभ्यासक्रमातील बदल, विषय शिक्षकांना समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाकडून प्रशिक्षण दिले जाते. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन एक महिना झाला असला तरी  बदललेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षकांना अद्याप प्रशिक्षण देण्यात आले नाही.आता हेच प्रशिक्षण शिक्षकांना ऑनलाइन देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे परंतु प्रशिक्षण  कधी देणार याबाबत काही  नियोजन नाही. 

राज्य शिक्षण संचालनालय, शिक्षण विभाग राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या अधिपत्याखाली यावर्षी सेमी व मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम बदलला, परंतु  नव्या अभ्यासक्रमाचे उन्हाळी सुट्टीत  प्रशिक्षण होणे गरजेचे होते. ते अद्यापपर्यंत झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नवीन अभ्यासक्रमामुळे शिकवण्याबाबत शिक्षकांमध्ये  संभ्रम निर्माण झाला आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या गलथान कारभाराचा फटका यंदा पहिली व आठवीच्या विद्यार्थी वर्गाला बसत आहे. आंधळं दळतंय अन .... अशीच काही स्थिती शिक्षण  विभागाची होते आहे. शिक्षण क्षेत्रातील बदल,वेळोवेळी घेतलेले निर्णय, निष्काळजीपणा, नियोजनाचा अभाव या सार्‍या बाबींचा शिक्षणावर परिणाम होत असतो. 

कोणता विषय कशा पद्धतीने शिकवायचा, कवितांची चाल कशा स्वरूपाची असेल, पुस्तकातील गाभा घटक किती महत्त्वाचा? नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकात केलेले बदल, अध्यापन पद्धती, क्षमतांच्या प्रमाणित कसोट्या, विषयनिहाय मूल्यमापन, गाभाभूत घटक, पुस्तकाचे अंतरंग या बाबी प्रशिक्षणातून स्पष्ट होत असतात. 

तज्ज्ञांनाही प्रशिक्षण नाही

राज्य व जिल्हास्तरीय तज्ञ मार्गदर्शकांचे देखील प्रशिक्षण झाले नसून या प्रशिक्षणानंतरच तालुका स्तरावर विशेष शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते, परंतु अद्याप कोणालाच प्रशिक्षण नसल्याने  शिक्षक संभ्रमात तर विद्यार्थी अनभिज्ञ  अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .