होमपेज › Marathwada ›  सोलार योजना ठेकेदार की अधिकार्‍यांसाठी?

 सोलार योजना ठेकेदार की अधिकार्‍यांसाठी?

Published On: Aug 24 2018 12:45AM | Last Updated: Aug 23 2018 10:39PMपरभणी : दिलीप माने

जिल्हा परिषदेकडून 5 लाख रुपये खर्च करून ड्वेलपंप योजना राबविली जात असून एवढा मोठा खर्च होऊनही अवघ्या 25 ते 30 घरांना याचा लाभ मिळतो. ही योजना चांगली असली तरी खर्चिक असल्यामुळे शासनावर खर्चाचा मोठा भुर्दंड पडत असला तरी यातून मात्र ठेकेदाराचे व अधिकार्‍यांचेच भले होत असल्यामुळे ही योजना गरीब वस्तीवरील नागरिकांसाठी का ठेकेदार अधिकार्‍यांसाठी अशी चर्चा रंगू लागली आहे.

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य करणार्‍या जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. याअंतर्गत असलेल्या विविध विभागामार्फत शासनाकडून आलेला निधी खर्च करून सर्वसामान्यांची कामे केली जातात. तसेच दळणवळणासाठी असलेले रस्तेही बनवले जातात. अशाच प्रकारे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी योग्य ते नियोजन केले जाते. यातूनच ग्रामीण भागातील खेड्यात उभारण्यात आलेल्या हातपंपावर विद्युत मोटार बसवून नागरिकांना पाण्याचा लाभ देण्यासाठी 1 एचपी सोलार ड्वेलपंप योजना मागील पाच वर्षापासून जिल्ह्यात राबवली जात आहे. सदरील योजनेतून दरवर्षी 30 ते 40 गावांत निधीचा वापर करून पाण्याची सुविधा पुरवली जात आहे. 

एका हातपंपावर योजना कार्यान्वित करण्याकरिता तब्बल साडेचार ते पाच लाखांचा निधी खर्च केला जात आहे. पण या योजनेचा लाभ केवळ अल्प वस्ती असलेल्या वाडीतांड्यातील नागरिकांनाच होत असल्याची ओरड आहे. पण ज्याठिकाणी मोठया लोकवस्ती कार्यरत आहे तेथील नागरिकांना आजही कोसोदूर भटकंती करत पाणी आणावे लागत असल्याचे वास्तव कायम आहे. यामुळे सदरील योजनेचा लाभ नेमका कोणासाठी आहे अशी ओरड होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरीत आहे. 

असे आहे योजनेचे स्वरूप : सदरील योजनेतून सुविधा पुरवण्यासाठी फंड-ग्राउंड वॉटर सप्लाय अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी पुणे या कंपनीची निवड झाली आहे. योजनेत 300 वॅट्सचे 3 सोलारचे पॅनॉल असतात. त्याठिकाणी 6 फूट उंच मॉडेल स्ट्रॅक्‍चरलवर बसवितात. यात 12 फूट उंचीचे लोखंडी गॅलरायझिंग स्टँड तयार करून त्यावर 5 हजार लिटरची टाकी आहेे. पॅनॉल फूटू नये म्हणून त्यालगत  तारकुंपन असते.  ज्या हातपंपाला पाणीपातळी चांगली आहे तेथे उभारली जाते. यात परिसरातील तब्बल 300 ते 400 मीटरपर्यंत अंतरावरील घरांना नळ कनेक्शन दिले जाते.