होमपेज › Marathwada › चार कोटींतून होणार शाळांचा कायापालट

चार कोटींतून होणार शाळांचा कायापालट

Published On: May 11 2018 1:39AM | Last Updated: May 11 2018 12:48AMबीड : दिनेश गुळवे

जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांना दुरुस्त करण्यासाठी व विद्यार्थ्यांना निसंकोचपणे ज्ञानार्जन करता यावे यासाठी जिल्ह्यात कायापालट समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या झालेल्या चार बैठकांतून शाळांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे धोकादायक झालेल्या शाळांचा आता कायापालट होणार आहे. 

बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळा आहेत. यातील काही शाळा या निजाम कालीन आहेत. तर, काही ठिकाणी शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. अनेकदा पावसाळ्यामध्ये शाळाखोल्या गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठीही जागा राहत नाही. शाळांची अशी दयनीय अवस्था झाल्याने खोल्या बांधणे, दुरुस्ती याचा प्रश्‍न सातत्याने समोर येत आहे. जिल्ह्यातील शाळा खोल्या बांधणे, दुरुस्ती यासह इतर कामांसाठी दोनशे कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र, एवढा मोठा निधी उपलब्ध होऊ शकत नसल्याने अशाही परिस्थितीत शाळा खोल्या सुधारण्यासाठी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कायापालट समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये तत्कालीन खा. रजनीताई पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व शिक्षणाधिकारी यांच्यासह सेवाभावी संस्थेच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. 

या समितीने जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेऊन सुरुवातीला प्रत्येक जिल्हा परिषद गटातून चार शाळा दुरस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी खा. मुंडे यांनी आपल्या निधीतून एक कोटी दहा लाख रुपये दिले आहेत. या निधीतून प्रत्येक तालुक्यात दहा लाख रुपये खर्च करून शाळा दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासह जिल्हा नियोजन आयोगाकडूनही शाळा दुरस्तीसाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासह इतर निधीही घेण्यात येणार आहे. या निधीमधून प्राधान्य क्रमाने आवश्यकता असलेल्या शाळांची अगोदर दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे विद्यार्थ्यांना निर्भय वातावरणात ज्ञानार्जन करता येणार आहे.

आमदारांकडे 50 लाखांची मागणी

जिल्ह्यातील काही शाळांची अतिशय दुरवस्था झाल्याने या शाळाखोल्या दुरुस्त करण्यासाठी कायापालट समितीने जिल्ह्यातील सर्व आमदारांकडे  प्रत्त्येकी 50 लाखांची मागणी केली आहे. या वर्षीच्या आमदार निधीतून हा निधी देण्याचे पत्रही काही आमदार महोदयांनी कायापालट समितीला दिले आहे. यासह औद्योगिक कंपन्यांच्या (टीएसआर) निधीतूनही काही शाळांची दुरुस्ती करण्यासाठी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

शाळादुरुस्तीसाठी आर्थिक सहकार्य

जिल्ह्यातील ज्या शाळांची तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे, अशा शाळांची माहिती घेण्यात आली आहे. आचार संहिता संपल्यानंतर अशा शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे पालक निसंकोच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवितील. यासाठी सामान्य नागरिकांनीही 15 हजार 400 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. नागरिकांनी शाळादुरुस्तीसाठी आर्थिक सहकार्य करावे. - राजेसाहेब देशमुख, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, बीड.