Thu, Oct 01, 2020 18:32होमपेज › Marathwada › दिवाळखोर मित्रासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळ : काँग्रेस

'दिवाळखोर मित्रासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळ'

Published On: Dec 26 2018 8:05PM | Last Updated: Dec 26 2018 8:05PM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगपती मित्रासाठी पंतप्रधान यांनी देशाच्या सुरक्षेशी खेळ चालविला आहे, अशी घणाघाती टिका प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्‍ते राजू वाघमारे यांनी केली. राफेलच्या किंमती जाहीर करण्यास पंतप्रधानांचे तोंड कोणाच्या दबावामुळे बंद आहे, याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, असे आवाहन उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत त्यांनी केले.

राफेलवरुन केंद्र सरकारला विशेषत: पंतप्रधान आणि भाजपला खिंडीत गाठणार्‍या काँग्रेसने आता प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेश प्रवक्‍ते वाघमारे बुधवारी उस्मानाबादेत आले होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात ५७० कोटी रुपये किंमत निश्‍चित झाली असताना नंतर मोदी सरकारमधील संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत बोलताना विमानाची किंमत ६७० कोटी रुपये झाल्याचे सांगितले. तेही एखादेवेळेस मान्य आहे. वास्तविक आघाडी सरकारने १२६ विमानांचा करार केला असताना केवळ ३६ विमाने खरेदी करण्याचा व प्रत्येकाची किंमत १६७० कोटी करण्याचा करार पंतप्रधान मोदींनी केला. यात ऑफसेट पार्टनर म्हणून केवळ एक महिन्याआधी नोंदणी झालेल्या उद्योगपती मित्राच्या कंपनीला निवडण्यासाठी फ्रान्समधील संबंधित कंपनीवर पंतप्रधानांनी दबाव आणला. तेथील तत्कालिन पंतप्रधानांनी हे जाहीरपणे सांगितले आहे. त्यासाठीच आम्ही या प्रकरणाची चौकशी संयुक्‍त संसदीय समितीमार्फत करण्याची मागणी पहिल्यापासून केली आहे. संरक्षणविषयक बाबींमध्ये सर्वोच्च न्यायालयाला मर्यादा आहेत.

त्यामुळे सरकारपुरस्कृत याचिका तिथे सादर करुने केंद्र सरकारने क्‍लीन चिट मिळविली आहे. कॅगने अजून अहवालच तयार केला नसताना तो संसदेत मांडल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. ही बाब गंभीर असून अर्धा-अर्धा तास मन की बात करणार्‍या मोदींनी एक तर राफेची किंमत जाहीर करावी किंवा जेपीसी चौकशीची मागणी मान्य करावी. यासाठी केवळ एक सेकंद लागेल, अशी टिकाही वाघमारे यांनी केली.