Sat, Aug 08, 2020 12:39होमपेज › Marathwada › लातूर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता

लातूर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता

Last Updated: Jul 02 2020 7:58PM
लातूर : पुढारी वृतसेवा

शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत ३८७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात गेल्या सात दिवसांत १२९ नवे रूग्ण आढळले आहेत. यात १३८ रूग्ण एकट्या लातूर शहरातील असल्याने नागरिक धास्तावले आहेत.

वाढलेली भीती कमी करण्यासह कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहर १४ दिवस पुन्हा लॉकडाऊन करावे, अशी विनंती महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. त्यासंदर्भात महापौर आणि उपमहापौर यांनी जिल्हाधिकारी व आयुक्तांना पत्र पाठवली आहेत. दरम्यान वाढत जाणाऱ्या कोरोना संसर्गामुळे खुद्द प्रशासनही गंभीर असल्याने शहरात पुन्हा लॉकडाऊनचा आदेश केव्हाही निघू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

लातूर जिल्ह्यात नव्याने १७ पॉझिटिव्ह

या संदर्भात गुरूवारी (दि.२) महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी नगरसेवक तसेच संबधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकरिता कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी केल्या. तसेच शहरातील वाढती रूग्ण संख्या पाहता साखळी तोडण्याकरिता शनिवार पासून १४ दिवसाचे कडक लॉकडाऊन लागू करावे असे एक मत झाले आहे. 

लातूर हादरला, एकाच दिवशी २९ पॉझिटिव्ह

दरम्यान शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत सर्व मनपा पदाधिकारी, सभागृह नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष यांनीही दूरध्वनीद्वारे सहमती दर्शवली आहे. यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लातुरकरांच्या नजरा लागल्या आहेत.