Wed, May 19, 2021 04:39
उस्‍मानाबाद : पैसे मागितल्‍याच्या कारणावरून गोळीबार, २ जण जखमी  

Last Updated: May 01 2021 11:09PM

पाडोळी : पुढारी वृत्‍तसेवा 

उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी  बेंबळी येथे गोळीबारात दोनजण जखमी झाल्‍याची घटना घडली आहे. पाच  वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या मोटारसायकलचे पैसे का मागितले? या कारणावरून  रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करण्यात आल्याने दोनजण जखमी झाले असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

आज (शनिवार)  पाच वाजण्याच्या  वाजण्याच्या सुमारास मौजे टाकळी ( बेंबळी ) येथे दिपक धनाजी जगताप याने त्याच्याकडील  रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर केल्याने दोन इसम किरकोळ जखमी झाले आहेत.  टाकळी  बेंबळी येथील अनिल राम सूर्यवंशी आणि  दीपक जगताप हे  एकमेकांच्या  ओळखीचे आहेत. दीपक जगताप याने अनिल सूर्यवंशी याची पाच  वर्षांपूर्वी मोटारसायकल विकली होती, त्या पैश्याच्या वादातून दोघात आज वाद झाला आणि या वादातून गोळीबार झाला आहे. 

दिपक धनाजी जगताप (सध्या स्थायिक भिवंडी) हा लॉकडाऊनमध्ये त्याच्या तीन मित्रासोबत टाकळी येथे आला होता. टाकळी येथील अनिल सूर्यवंशी नावाच्या इसमाकडून त्याने पाच वर्षांपूर्वी डिस्कवर मोटरसायकल विकत घेतली होती. सदर डिस्कवरचे पैसे  अनिल सूर्यवंशी  मागत होता. त्याचा राग मनात धरून पाच  वाजण्याच्या सुमारास समाज मंदिर येथे सूर्यवंशी व अन्य दोन इसम गप्पा मारत बसले असताना दिपक धनाजी जगताप यांनी तेथे येऊन त्याच्या कडील रिव्हॉल्व्हरने जमिनीवर फायर केल्याने त्याचे छर्रे उडून ते सूर्यवंशी यांच्यासोबतच्या दोन इसमांना लागले. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. 

त्यानंतर  सदरचे चारही इसम दोन मोटारसायकलवरून उस्मानाबादच्या दिशेने निघून गेले. या बाबत नियंत्रण कक्षाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सदर घटनेतील दीपक धनाजी जगताप याने काळ्या रंगाचे जॅकेट घातले असून, काळा गॉगल लावलेला आहे. तसेच अन्य तीन पैकी एकाने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट व एकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. त्यांनी पळून जाण्यासाठी दोन मोटारसायकली वापरल्या असून एक काळया रंगाची पल्सर व एक स्कूटर आहे. घटनेची माहिती मिळताच, बेंबळी पोलिस स्टेशनचे पोलिस टाकळी बेंबळी येथे दाखल झाले असून, घटनेचा पंचनामा सुरु आहे.