Mon, Jan 18, 2021 18:46
नांदेड : अर्धापुरात बिबट्या पडला विहिरीत; रेस्क्यु आपरेशन सुरु 

Last Updated: Jan 14 2021 5:42PM
अर्धापूर (नांदेड) : पुढारी वृत्तसेवा

नांदेड जिल्ह्यातील रोडगी शिवारात विहिरीत बिबट्या पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यु आपरेशन सुरु झाले आहे. वनविभाग, पोलिस यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याचबरोबर घटनास्थळी बघ्याची  गर्दी झाल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 

रोडगी शिवारात अनिल कदम यांचे शेत आहे. या शेतात एक पडीत विहीर असून या विहिरीचा फारसा उपयोग होत नसल्याने  या पडक्या विहीरीत बुधवारी (ता. १३) रात्री बिबट्या पडला असावा असा प्राथमिक आंदाज आहे. शेतातील नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी सालदार, कदम कुटुंबीय आले. ही विहीर उपयोगात नसल्यामुळे कोणी तिकडे लक्ष दिले नाही. पण सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याने डरकाळी फोडून आपल्या अस्तित्वाची जाणिव करुन दिली. 

डरकाळीचा आवाज विहिरीकडून आल्याने शेतातील नागरिक विहिरीकडे धावले. बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गावात ही वार्ता पसरली. सदरील घटनेबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यांनंतर वनविभाग, पोलिस अधिकारी पथक घेऊन दुपारी हजर झाले. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 
दरम्यान ही वार्ता गावात पसरल्यानंतर बघ्यांनी परिसरात एकच गर्दी केली. त्यामुळे शेतातील हळद, हरभरा पिकाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. वनविभाग बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु ही यत्रंणा मोठ्या प्रमाणात नसल्याने बिबट्याला बाहेर काढण्यात वेळ लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.