होमपेज › Marathwada › राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आ. देशमुखांना धक्काबुक्की?

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आ. देशमुखांना धक्काबुक्की?

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:49AMमाजलगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील राजेवाडी येथे अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम आटोपून परत निघालेल्या आ. आर. टी. देशमुख यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची अफवा समाज माध्यमात पसरली होती. दरम्यान पत्रकार परिषद घेऊन आमदार देशमुख यांनी धक्काबुक्की झाल्याची चर्चा अफवा असल्याचे म्हटले आहे. गाडी अडवून काही कार्यकर्त्यांनी विकासकामा बाबत विचारणा केली. त्यांना समाधानकारक उत्तर दिले मात्र धक्का बुक्की सारखा प्रकार घडला नसल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. 

माजलगाव मतदारसंघातील राजेवाडी येथे बुधवारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आमदार देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जयंतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान आ. देशमुख परत जात असताना जिल्हा परिषद शाळेजवळ राष्ट्रवादीचे उपसरपंच पती रामेश्वर थेटे व दीपक महागोविंद, भाऊसाहेब पवार, माउली महागोविंद, ईश्वर थेटे, सुखदेव कुरे आदी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आ. देशमुख यांची गाडी आडवून राजेवाडी येथे चार वर्षांत एकही विकास काम का केले नाही? बंधार्‍याचे काम का केले नाही? अशी विचारना केली. सदरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लोकप्रतीनिधी या नात्याने आमदार देशमुख यांनी समाधानकारक उत्तर दिले.

कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर देशमुख राजेगाव येथून परतले. दरम्यान समाज माध्यमात आ. देशमुख राजेगाव येथून परत येत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाडी आडवून देशमुख यांना धक्काबुक्की केल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळे समाज माध्यमात उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. या अफवेमुळे जातीय तनाव निर्माण होऊ नये, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमदार आर. टी. देशमुख यांनी बुधवारी सायंकाळी माजलगाव येथे पत्रकार परिषद घेऊन धक्का बुक्की झाल्याची समाज माध्यमातील चर्चा अफवा असल्याचे म्हटले आहे. किरकोळ प्रकार घडला, मात्र धक्का बुक्की झाली नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या अफवेवर विश्‍वास न ठेवता संयम बाळगावा असे आवाहन त्यांनी केले आहे.