बीड : प्रतिनिधी
आजच्या तरुणाईला फेसबुकचे अक्षरक्षः वेड लागले आहे. ओळखी व अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करून चॅटिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशी एक प्रेम कहानी फे सबुकवरून सुरू झाली. आठवर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीच्या प्रेमात एक अल्पवयीन मुलगा पडला. लग्न करण्यासाठी दोघे पळून गेले असून त्यांचा शोध बीड पोलिस घेत आहेत.
बीड शहरातील बालेपीर भागातील अनुज (नाव बदलले आहे) हा 17 वर्षीय युवक सध्या बारावीची परीक्षा देत होता. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर त्याची मैत्री राजस्थान मधील जयपूर येथे राहणार्या चंचल (नाव बदलले आहे) या 25 वर्षीय तरुणीशी झाली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याची दोघांच्याही घरी कसलीच कल्पना नव्हती. अचानक शनिवारी 3 मार्च रोजी अनुज चंचलला घेऊन स्वतःच्या घरी आला आणि दोघांचे प्रेमप्रकरण असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले. आमच्या दोघांचे लग्न लावून द्या, असा त्याने हट्ट धरला.
यावर अनुजच्या मोठ्या भावाने चंचलची विचारपूस केली. त्यावेळेस ती म्हणाली की आमची फेसबुकवर मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याने मी इथवर आले, परंतु अनुजच्या आणि माझ्या वयात खूपच अंतर असल्यामुळे मी माघारी जाण्याच्या विचारात आहे, असे बोलून तिने तिला औरंगाबाद पर्यंत नेऊन सोडण्याची विनंती अनुजच्या कुटुंबीयांकडे केली. तिच्या विनंतीनुसार अनुजच्या भावाचे मेहुणे, मामा आणि आई यांनी तिला औरंगाबादला नेऊन सोडले, परंतु त्यानंतर चंचलच्या प्रेमात आकंठ बुडालेला अनुजने चंचल सोबतच लग्न करायचे आहे, तुम्ही माझे लग्न लावून द्या असा हट्ट सुरूच ठेवला होता.
त्यानंतर रविवारी 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अनुज घरातून बेपत्ता झाला. सोबतच, घरातील कपाटात ठेवलेले 18 हजार रुपये देखील आढळून आले नाहीत. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. अखेर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून अनुजला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख हे करत आहेत.