परभणी/जालना : पुढारी वृत्तसेवा
विदर्भातील बाधितांची वाढती संख्या पाहता विदर्भाकडे जाणार्या एसटी बसगाड्या बंद करण्याचा निर्णय परभणी, जालना प्रशासनाने घेतला आहे. नांदेडची वाहतूक तूर्त चालू असली तरी यवतमाळ सीमेवर अँटिजेन टेस्ट सुरू केली आहे. बुलडाणा, चिखली, अकोला, यवतमाळ, वाशिम, पुसद, उमरखेड असा विदर्भातील भाग मराठवाड्याला लागून आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांचा विदर्भाशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबादेत रात्रीची संचारबंदी
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद महापालिका हद्दीत मंगळवारपासून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेदरम्यान संचारबंदी जारी केली. 8 मार्चपर्यंत हा आदेश लागू राहील. या वेळेत आरोग्य सेवा, जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडता येणार नाही.