Sun, Aug 09, 2020 06:02होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण : अर्धनग्‍न आंदोलनातून शासनाचा निषेध

मराठा आरक्षण : अर्धनग्‍न आंदोलनातून शासनाचा निषेध

Published On: Aug 05 2018 1:30AM | Last Updated: Aug 04 2018 11:15PMहिंगोली : प्रतिनिधी

मराठा आरक्षण मिळावे, यासाठी हिंगोलीत सहाव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. ठिय्या आंदोलनात संतप्‍त आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ अर्धनग्‍न आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवला. सेनगाव शहरात बेमुदत ठिय्या आंदोलन व तालुक्यातील आजेगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर वसमत येथे तिसर्‍या दिवशीही उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच होते.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीकरिता हिंगोलीतील गांधी चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शनिवारी ठिय्या आंदोलनादरम्यान, संतप्‍त युवकांनी अर्धनग्‍न होत आंदोलन करून मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातील महात्मा गांधी चौकात 30 जुलैपासून मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. प्रत्येक दिवशी आगळेवेगळे आंदोलन छेडले जात असताना सहाव्या दिवशी शनिवारी आंदोलकांनी अर्धनग्न होत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पूर्ण प्रदक्षिणा घातली. मुख्यमंत्र्यांचा फोटो आंदोलकांनी उराशी उलटा धरून आरक्षणाची मागणी केली.

परळी येथे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हिंगोली येथेही ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत अद्यापही सकारात्मक नसल्याने आंदोलकांनी आरक्षणाशिवाय माघार नाही, असा पवित्रा घेत आंदोलन सुरूच ठेवले आहे.ठिय्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शनिवारी (दि.4) दुपारी 3 च्या सुमारास आंदोलकांनी अर्धनग्न होत सरकारविरुद्ध आपल्या भाषणातून रोष व्यक्त केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा फोटो उलटा धरून सर्व आंदोलकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घातली. यावेळी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली.

विविध संस्था, संघटनांनी दर्शविला पाठिंबा ः हिंगोली जिल्हा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आरक्षणाबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन आंदोलन ठिकाणीही पाठिंबा दर्शविला. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ग्रेन मर्चट असोसिएशनच्या वतीनेही पाठिंबा दिला. तसेच जिल्हा वकील संघानेही प्रत्यक्ष उपस्थिती लावत मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लावून धरली. तर आज रविवारी (दि.5) केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आंदोलनस्थळी जाऊन आपला पाठिंबा दर्शविणार आहेत. आंदोलनात भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह आदी राजकीय पक्षानेही मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

सेनगावात रास्ता रोको ः सेनगाव : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सेनगावात शनिवारी (दि.4) बेमुदत ठिय्या आंदोलन तर आजेगाव येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या मराठा बांधवाला आर्थिक मदत देऊन त्याच्या कुटुंबातील व्यक्‍तीला नोकरीत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. राज्यभरातील होणार्‍या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात येत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. 

सेनगाव शहरात तहसील कार्यालयालगत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर आजेगाव येथे सेनगाव ते आजेगाव रोडवर अकरा वाजता मराठा कार्यकर्त्यांच्या वतीने अर्धातास आंदोलन करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी धुळे यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले. आंदोलनादरम्यान, गोरेगाव पोलिस ठाण्याचे स.पो.नि. करंटलु यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.