Tue, Sep 29, 2020 19:15होमपेज › Marathwada › लातूर : निलंगेकरांनी गमावले; देशमुखांनी कमावले!

लातूर : निलंगेकरांनी गमावले; देशमुखांनी कमावले!

Published On: Aug 06 2018 10:08AM | Last Updated: Aug 06 2018 10:08AMविजयकुमार स्वामी

संधीचे सोने करण्याचे कसब सवार्र्ंनाच अवगत नसते. अनेकदा संधी मिळते, पण एका अनामिक भीती व संशयामुळे ती साधता येतेच असे नाही, तर काही वेळा योग्य निर्णयक्षमता, धाडस आणि जन्मजात संस्कार कामी येतात. कधी कोणता निर्णय फायद्याचा ठरेल अन् कशामुळे नुकसान पदरात पडेल, याचा काही नेम राजकारणात नसतो. सध्या भरात असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाने मराठा समाजाच्याच नेतृत्वाच्या उरात धडकी निर्माण केली आहे. मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असाह्य झाल्याने गेले दीड-दोन वर्षे सकल मराठा समाजाने राखलेला संयम, सद्भाव, शांततेची भूमिका गळून पडली व आरक्षण आंदोलनाने आक्रमक रूप धारण केले. काकासाहेब शिंदे याच्या जलसमाधीच्या घटनेनंतर जनमत प्रक्षुब्ध झाले. हिंसक आंदोलनानेही प्रश्‍न सुटत नसल्याने मराठा आमदार, खासदारांच्या घरावर ठिय्या मारण्याबरोबरच त्यांना धारेवर धरून जाब विचारण्याचा मार्ग अवलंबला गेला. प्रस्थापित मराठा नेतृत्व हादरले.

लातूर जिल्ह्यातही दरदिवशी आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. राज्याच्या राजकारणात नेहमीच चलनी ठरलेला लातूर हा चाकूरकर-देशमुख-निलंगेकरांचा जिल्हा. निलंगेकरांची सहा दशके, चाकूरकरांची पाच आणि देशमुखांची चार दशकांची राजकीय वाटचाल. आता दुसरी पिढी वारसा चालवतेय. माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकरांच्या मनात ‘पुत्र प्रेमा’पोटी कितीही खदखद असली तरीही त्यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता व कर्तृत्व त्यांचे कट्टर विरोधक असलेले नातू, विद्यमान पालकमंत्री संभाजी पाटील यांच्यातच आहे. त्याचप्रमाणे दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचा वारसा निर्विवादपणे ज्येष्ठ सुपुत्र माजी पालकमंत्री आमदार अमित हे चालवत आहेत. दोन्ही नेते तरुण आणि वारसाहक्‍काने राजकारणात आलेले आहेत.

नेतृत्व, पक्षसंघटना, विचाराने पूर्ण वेगळे, असे असले तरी बहुतेक वेळा राजकारण करताना राजकीय गुण दिसून येतात व ‘उन्नीस-बीस’ची चर्चा सुरू होते. मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाने पुन्हा तीच चर्चा सुरू झाली. झाले असे की, ठिय्या आंदोलनासाठी पहिल्याच दिवशी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या घराची निवड केली होती. योगायोगाने पालकमंत्री लातूर दौर्‍यावर होते. लातूर शहरात असूनही आणि आपल्या घरावर आंदोलक चाल करून गेल्याचे माहीत असूनही निलंगेकरांनी घराकडे पाठ फिरवली. ना त्यांनी आंदोलकांची भेट घेतली, ना समजूत काढण्याचा कसलाही प्रयत्न केला. उलट ‘गनिमी काव्या’चा अवलंब करीत सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम आटोपून ते मुंबईस निघून गेले.

नेमकी याच्याविरुद्ध कृती बाभळगावच्या देशमुखांची राहिली. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख हे गोव्याचे प्रभारी असून योगायोगाने ‘गढी’च्या दरवाजावर मराठा आंदोलक धडकले तेव्हा ते गोवा प्रदेश काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभागी होते, मात्र गोव्यात असूनही अमित देशमुख जणू ‘गढी’वर असल्याचा प्रत्यय सर्वांना आला. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बाभळगावात मोठा बंदोबस्त, पोलिसांचा फौजफाटा, बॅरिकेड्स उभारले गेले. आंदोलनाची तीव्रता, समाजाच्या भावना, तरुणाईची मानसिकता लक्षात घेता कसलाही अप्रिय प्रकार होऊ नये, म्हणून अमित देशमुख यांनी गोव्याहून खास निर्देश देऊन बंदोबस्त शिथील केला. आंदोलकांना सुरक्षित ‘गढी’वर पोहचवण्याचे आणि तेथे यथोचित स्वागताची सूचना समर्थकांना केली. इतकेच नव्हे तर एक प्रतिनिधी मंडळही नेमले.

प्रसंग कसाही असो, बाभळगावकर ग्रामस्थ पाहुण्यांची नेहमीच सरबराई करतात. त्यात याही वेळी कसली कुचराई नव्हती. देशमुखांनी ‘गढी’वर आणि गावकर्‍यांनी गावात आंदोलकांचे स्वागत, चहापान, नाश्त्यासोबत निवार्‍याची केलेली सोय आंदोलकांना एक सुखद धक्‍का होता. त्यामुळे आदल्या दिवशी विद्यमान पालकमंत्र्यांच्या घरासमोरचा उन्माद माजी पालकमंत्र्यांच्या बाभळगावात कुठेच जाणवला नाही आणि हेच दोन युवा नेत्यांच्या स्वभावगुण, कार्यशैलीची तुलना व राजकीय वारशावर चर्चेचे कारण झाले. ‘राजकारण करताना जीभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवावा लागतो’, असे नेहमीच
विलासराव देशमुख सांगायचे. बाकी काही नसले तरी विलासरावांचा नेमका हाच गुण अमित यांनी घेतला आहे, हेच या कृतीने दिसून आले. आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने आंदोलकांच्या भावना जाणून घेण्याची आणि समाजाबरोबर आहोत, हे दाखवून देण्याची संधी संभाजी निलंगेकरांनी गमावली तर उपजत स्वभाव गुणांमुळे अमित देशमुखांनी ते कमावले, हे नक्‍की....!

मराठवाड्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवणार्‍या देशमुख व निलंगेकर परिवाराचा राजकीय वारसा पुढे चालवणार्‍या दोन युवा नेत्यांच्या दोन पद्धतींची सध्या लातूर जिल्ह्यात चर्चा रंगते आहे. भिन्न स्वभाव गुण व कार्यशैलीमुळे अलीकडे ‘गढी’वरचे देशमुख आणि ‘वाड्या’तले निलंगेकर यांची तुलना वाढली आहे. नेतृत्वाच्या आघाडीवर चाकूरकरांचा देव अजून ‘देवघरातच’ आहे. किमान त्यांचा वारसदार येईपर्यंत तरी ही तुलना होतच राहणार आहे.