Sat, Aug 08, 2020 14:46होमपेज › Marathwada › कडकनाथ घोटाळा : गुन्हा दाखल करून घेण्यास उस्मानाबाद पोलिसांची टाळाटाळ 

कडकनाथ घोटाळा : गुन्हा दाखल करून घेण्यास उस्मानाबाद पोलिसांची टाळाटाळ 

Published On: Sep 10 2019 4:52PM | Last Updated: Sep 10 2019 4:52PM

संग्रहित छायाचित्रमुरूम (उस्मानाबाद) : प्रतिनिधी

उमरगा तालुक्यातील निंबाळ येथील कल्लेश्वर जाधव, प्रमोद जाधव व ज्ञानेश्वर बिराजदार या शेतकऱ्याची कडकनाथ घोटाळा प्रकरणी फसवणुक झाल्याचे समोर आले आहे. प्रत्येकी ९९ हजार असे एकूण २ लाख ९७ हजारांची महा रयत ऍग्रो कंपनीकडून फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्याने सांगीतले आहे. याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मुरूम पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तर दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

महा रयत ऍग्रो ही कंपनी इस्लामपूर येथे मुख्य कार्यालय आहे. या कंपनीकडून शेतकऱ्यांना करोडो रुपायचा चुना लावल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्राभर असल्याची चर्चा रंगत असतानाच त्याची  पाळेमुळे आता उमरगा तालुक्यापर्यंत पोहोचले असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे . उमरगा तालुक्यातील निंबाळा येथील शेतकरी कलेश्वर जाधव, त्यांचा मुलगा प्रमोद जाधव व ज्ञानेश्वर बिराजदार नामक या तीन शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडी पालन करण्यासाठी ३३० पिल्ले घेतली होती.  

तसेच कोंबडी पालनासाठी लागणारे सर्व खाद्य व लस इत्यादी संपूर्ण साहित्य कंपनी कडून दिले जाईल. वर्षभर शेतकऱ्यांनी याचे पालन पोषण करून वर्षांनंतर या कोंबड्या कंपनी घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांना फक्त पालन पोशन करण्यासाठी त्याचा मोबदला म्हणून महिन्याकाठी १० हजार पगार देऊ अशी प्रलोभने देण्यात आली होती. याला भुलून शेतकऱ्यांनी या कंपनीकडे अनामत रक्कम म्हणून ९९ हजार रू जमा करायचे अशी माहिती दिली होती. कलेश्वर जाधव व त्यांचा मुलगा प्रमोद जाधव यांनी दिनांक २५ जुलै २०१९ रोजी व ज्ञानेश्वर बिराजदार यांनी दिनांक ३० जुलै रोजी लोकमंगल मल्टिस्टेट शाखा उमरगा येथून आर टी जी एसने प्रत्येकी ९९ हजार असे एकूण २ लाख ९७  हजार महारयत ऍग्रो कंपनीकडे अनामत रक्कम म्हणून जमा केली. 

पण त्यांना त्याबदल्यात शेतकऱ्यांना कंपनी कडून मिळणाऱ्या कोंबडीचे ३३० पिल्लांचे पालन करण्यासाठी मागणी शेतकऱ्यांनी केली असता कंपनीडून वारंवार तारीख दिली जात होती. जेंव्हा कडकनाथ कोंबडीचा घोटाळा झाला आहे, अशी माहिती या शेतकऱ्यांना मिळताच आपली फसवणूक झाल्याचे जेंव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात आले. यावेळी इस्लामपूर पोलीस स्टेशन गाठले आसता संबधित पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्ही ज्या गावात राहता तेथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या. अशी माहिती दिली त्यानुसार शेतकऱ्यांनी मुरूम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेले. मुरूम पोलिसांनी तो अर्ज दाखल करून घेतला त्याला आता १० दिवस उलटून गेले अजूनपर्यंत कसल्याच प्रकारचा गुन्हा त्या कंपनीच्या विरोधात दाखल केला नाही. 

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा कोण समजून घेणार व त्यांना कोण न्याय देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरील प्रकरणात झालेल्या फसवणूकितील मुख्य आरोपी एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वरिष्ठपातळीवरून दखल घेऊन राज्यातील फसवणूक झालेल्या लाखो शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे .

मी गेली दहा ते पंधरा दिवस झाले मुरूम पोलिस स्टेशनला जाऊन आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक बारवकर यांना विनवणी करत आहे. तरी माझी बाजू सुद्धा एकूण घेण्याची तसदी घेतली नाही त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. 

कलेश्वर नारायण जाधव : पीडित शेतकरी, काळ निंबाळा 

मी गेली दोन ते चार दिवस झाले शासकीय कामानिमित्त बाहेर गावी होते. त्यामुळे मला याबाबत कसलीच माहिती नाही. याबाबत मी संपुर्ण माहिती घेऊन स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी यांना गुन्हा नोंद करून घेण्याबाबत सूचना दिले जातील.

अनुराधा गुरव : उपविभागीय पोलिस अधिकारी ,उमरगा