होमपेज › Marathwada › शासकीय कार्यालयेही तहानलेली 

शासकीय कार्यालयेही तहानलेली 

Published On: Dec 10 2018 1:12AM | Last Updated: Dec 09 2018 10:00PM
शिरूर : प्रतिनिधी 

सध्या तालुक्यांमध्ये भयावह दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाणी टंचाई  तीव्र प्रमाणात जाणवत आहे. तालुक्यातील शासकीय कार्यालयात पाणी पिण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे कार्यालयात येणार्‍यांना पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर कार्यालयातही काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही बहुतांश वेळा पिण्यासाठी पाणी नसते. शासकीय कार्यालयाला पाण्याअभावी कोरड पडलेली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. 

पाणी पातळी मध्ये घट झाल्याने सार्वजनिक ठिकाणी असलेले  पाणवठे कोरडेठाक पडलेले आहेत. प्रशासकीय कार्यालयातही आता दुष्काळ जाणवू लागली आहे.  कार्यालयामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पर्यायाने कार्यालयीन कामकाजाच्या वेळी अधिकार्‍यांना विकतच्या पाण्याचा आधार घेऊन कार्यालयीन कामकाज पार पाडावे लागते. परंतु कामकाजासाठी कार्यालयात गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्यांच्या घशाला कोरड मात्र कायम राहते.काही वेळा कार्यालयातही पाणी नसल्यामुळे पाणी पिण्यासाठी बाहेर जावे लागत असल्याचे एका ग्राम पंचायत कर्मचार्‍याने सांगितले. एका अधिकार्‍याने सांगितले की, बहुतांश वेळा कर्मचार्‍यांसाठी जारच्या पाण्याची व्यवस्था केली जाते मात्र आता जार मिळणेही मुश्किल झाले आहे. कार्यालयात पाणी उपलब्ध असावे यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो. 

पूर्वी सर्व नागरिकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणपोया उभ्या केल्या जात असत मात्र दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाणीच नसल्याने पाणी पोयाही उभारल्या जात नसल्याची दिसून येत आहे. प्रशासनाच्यावतीने पाणपोया सुरु कराव्यात अशी मागणी शेतकर्‍यांसह तालुक्यातील सर्व सामान्यांतून होत आहे. 

पाण्याची उपलब्धता नसलेले कार्यालय

शिरूर तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र यासह आरोग्य उपकेंद्र,तलाठी कार्यालये यासह शासकीय निमशासकीय राष्ट्रीयीकृत बँका यामध्ये पाणी टंचाईचा मोठा अभाव जाणवतो. या कार्यालयात सध्या पाण्याचा ठणठणाट पडलेला असून याची झळ सर्वसामान्य नागरिकांना सहन करावी लागत आहे.

घोटभरपाण्यासाठी घ्यावा लागतो चहा

काही कामानिमित्त ग्रामीण भागातून शिरूर शहरात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना जर तहान लागली तर  हॉटेलमध्ये सहज पिण्यास पाणी मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने चहा घ्यावा लागतो. चहा घ्यायचा असेल तरच हॉटेलमध्ये पाणी पिण्यास परवानगी देण्यात येत असल्याने सध्या या परिस्थितीवर तालुक्यातील पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात येत आहे. साधे पाणीही विकत घ्यावे लागत असल्याने त्यांनाही मोफ त पाणी देणे परवडत नाही, अशी प्रतिक्रिया हॉटेल चालक देत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.