Tue, Aug 04, 2020 10:31होमपेज › Marathwada › मराठवाड्याला ऊसमुक्‍त करा : जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा

मराठवाड्याला ऊसमुक्‍त करा : जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा

Published On: Jun 16 2019 1:47AM | Last Updated: Jun 15 2019 10:13PM
लातूर :  प्रतिनिधी

भूजलाच्या अतिउपशाने मराठवाड्याचे वाळवंट होत असले तरी उसाचे पीक घेण्याची स्पर्धा इथे सुरुच आहे. मराठवाडा ऊसमुक्‍त झाल्याशिवाय या प्रदेशात सुखसमृद्धी नांदणार नाही, असे परखड मत व्यक्‍त करीत मराठवाड्याला ऊसमुक्‍त करा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शनिवारी येथे आयोजित मराठवाडा विकास परिषदेत केले.

बीजभाषक म्हणून राणा बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते.  दिलीपराव देशमुख, आ. विनायक पाटील, आ. प्रशांत बंब, आ. सुभाष साबने, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, माजी आ. शिवाजी पाटील-कव्हेकर, मनोहरराव गोमारे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना राणा म्हणाले, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. कधीकाळी अखंड वाहणार्‍या इथल्या नद्या आता मृत झाल्या आहेत. हे वास्तव असताना असताना पाण्याचा सुयोग्य वापर करणे व अल्प  पाण्यात अधिक उत्पन्न देणार्‍या  पिकांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु, अति पाणी पिणार्‍या उसालाच इथल्या शेतकर्‍यांनी स्वीकारले आहे. त्याला जगवण्यासाठी धरणातील पाण्यासह वर्षानुवर्षे साठलेल्या भूजलाचा बेसुमार उपसा होत आहे. यामुळेच मराठवाड्यावर जलसंकट ओढवले आहे. हे थांबले पाहिजे. त्यासाठी शेतकर्‍याला पीक पद्धती बदलावी लागेल. पर्जन्याला पूरक असलेली व अल्प पाण्यात जगणारी ज्वारी, बाजरी, हरभरा, मोहरीसारखी पिके आता घ्यावी लागतील. ‘उसाला नाकारा व अन्य पिकांना स्वीकारा’ हे म्हणण्याचे धाडस मताच्या राजकारणामुळे  कोणता राजकारणी दाखवणार नाही. प्राप्त परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन  संभाव्य संकट टाळण्यासाठी येथील शेतकर्‍यांनाच ते एकमताने घ्यावे लागेल. परंपरागत ज्ञान, संस्कार व व्यवहारामुळे मराठवाडा कधीकाळी समृद्ध क्षेत्र होते. आता ही भूमी समस्यांचे भांडार झाल्याची खंतही राणा यांनी यावेळी व्यक्‍त केली.

पालकमंत्री संभाजीराव पाटील- निलंगेकर यांनी मराठवाड्याच्या अधोगतीला यापूर्वीचे राजकीय नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप करीत आपल्या आजोबांनाही त्यास हातभार लावल्याचा टोला लगावला. तथापि, आम्ही मराठवाड्याच्या विकासाची जबाबादारी स्वीकारली आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून रोजगारासाठी आता कोणावरही स्थलांतराची वेळ येणार नाही.  कोणाचे पाय धरणे हा माझा स्वभाव नाही, परंतु जनहितासाठी ते करावे लागले तर त्यात मी माघार घेणार नाही. उजनीच्या पाण्यासाह मराठवाड्याच्या विकासासाठी हक्‍काने जे करणे शक्य आहे ते मी करेन, असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला.