Tue, Sep 29, 2020 19:36होमपेज › Marathwada › ऑडिओ क्लिप प्रकरणी धनंजय मुंडेंची पोलिसात तक्रार 

ऑडिओ क्लिप प्रकरणी धनंजय मुंडेंची पोलिसात तक्रार 

Published On: Mar 04 2018 8:35PM | Last Updated: Mar 04 2018 8:34PMपरळी : प्रतिनिधी

मागील तीन दिवसांपासून व्हॉट्सअप व इतर सोशल मीडियावर फिरणारी ऑडिओ क्लिप ही आपल्या आवाजाची नक्कल करून बनावटरित्या तयार केली असल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी माझी बदनामी करण्याकरिता व समाजातील आपली प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टीने बनावट ध्वनिफित तयार करून तिचा प्रचार व प्रसार करणार्‍या अज्ञान व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

मागील तीन दिवसांपासून सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप फिरत असून त्यात धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांबद्दल काही शब्द बोलल्याचा उल्लेख आहे. ही ध्वनिफित आपल्या आवाजाची नक्कल करून तयार करण्यात आली आहे. त्यामागे आपली समाजातील प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश आहे. या ध्वनिफितीतील आवाज आपला नसून कोणी तरी अज्ञात व्यक्तीने आपल्या राजकिय विरोधकांशी संगनमत करून आपल्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. आपण कोणाहीबद्दल अपशब्द वापरले नसल्याने या बनावट ध्वनिफित प्रकरणाची सखोल चौकशी करावी, ही ध्वनिफित फॉरेनसिक प्रयोगशाळेकडे पाठवून त्‍यातील आवाज कोणाचा आहे. याची चौकशी करून त्याच्या विरूध्द भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीत केली आहे. 

या प्रकरणी वाल्मिक कराड यांनी ही अशाच प्रकारे आणखी एक फिर्याद परळी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत अज्ञात व्यक्ती विरूध्द धनंजय मुंडे यांच्या आवाजाची बनावट क्लिप करून बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.