Tue, Aug 04, 2020 10:38होमपेज › Marathwada › परळीत बहीण-भाऊ; बीड, गेवराईत काका-पुतणे यांच्या लक्षवेधी लढती

परळीत बहीण-भाऊ; बीड, गेवराईत काका-पुतणे यांच्या लक्षवेधी लढती

Published On: Sep 11 2019 2:30AM | Last Updated: Sep 10 2019 9:11PM
बालाजी तोंडे

बीड जिल्ह्यातील तीन मतदार संघात नात्यागोत्यातील लढती राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहेत. परळी येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे भाजप आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी अशी बहीण-भावाची लढत होणार आहे. बीड येथे शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर विरुद्ध राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर, गेवराईत सेनेचे बदामराव पंडित विरुद्ध राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित या काका-पुतण्यामध्ये लढत होणार आहे. 

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी बहीण-भावाची लढत झाली होती. यात पंकजा मुंडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत भावाला पराभवाची धूळ चारली. पुन्हा एकदा परळीत असाच बहीण-भावाचा सामना रंगणार आहे. बहीण ग्रामविकास मंत्री, तर भाऊ विरोधी पक्षनेता असल्याने या हायव्होल्टेज लढतीकडे सार्‍या राज्याचे लक्ष असणार आहे. 2009 मध्ये गेवराईत बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित असा काका-पुतण्यात सामना झाला होता. यावेळी काका बदामराव पंडित यांनी पुतण्या अमरसिंह यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बदामराव पंडित यांनी सेनेकडून निवडणूक लढण्याची जोरदार तयार केली आहे. राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांचे लहान बंधू विजयसिंह पंडित मैदानात उतरणार आहेत. येथे पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्याचा सामना पाहायला मिळणार आहे. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सेनेत प्रवेश केला आणि प्रवेशानंतर अवघ्या महिनाभरात त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. सेनेकडून जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरणार आहेत, तर राष्ट्रवादीने संदीप क्षीरसागर यांना पुढे केले आहे. बीडमधील काका-पुतण्याचा हा सामना अतिशय लक्षवेधी ठरणार आहे. 

नात्यागोत्यातील लक्षवेधक लढतींसोबतच गेवराई, बीड, माजलगाव आणि आष्टी येथे उमेदवारी निश्चित करताना मोठा पेच निर्माण होणार आहे. युती झाल्यास पूर्वीच्या जागा वाटपाप्रमाणे बीडची जागा सेनेकडे असणार आहे. सेनेकडून जयदत्त क्षीरसागर निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. याच जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मेटे हे महायुतीतील घटकपक्ष असल्याने त्यांना दोन-तीन जागा द्याव्या लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या हितसंबंधामुळे त्यांना बीडची जागा मिळाली तरी स्थानिक भाजपला हे मान्य होणार नाही. मंत्री पंकजा मुंडेदेखील त्यांची उमेदवारी मान्य करणार नाहीत. बीडमध्ये भाजप, सेना आणि शिवसंग्राममध्ये उमेदवारीवरून मोठा संघर्ष होणार आहे. गेवराईत आ. लक्ष्मण पवार भाजपचे विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार बदामराव पंडित यांचा 60 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. बदमराव पंडित हे तीन वर्षांपूर्वी सेनेत गेले आहेत. युतीत गेवराईची जागा भाजपच्या वाट्याला असली तरी येथून बदामराव पंडित यांनी सेनेकडून दावा सांगितला आहे. येथे सेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण होणार आहे. 

आष्टी येथे विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांचे नाव जवळजवळ फायनल असले तरी आ. सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस हे भावी आमदार म्हणून मतदार संघात फिरत आहेत. आष्टीतील धस, धोंडे, दरेकर या थ्रीडी पैकी धस आणि दरेकर हे व्याही झाल्याने दोघे मिळून जयदत्त धस यांच्यासाठी प्रयत्न करणार आहेत. येथे भाजपमध्येच संघर्ष आहे. आष्टीत राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे आणि सतीश शिंदे  इच्छुक आहेत. 

माजलगाव मतदारसंघ हा भाजपचा बोलकिल्ला आहे. येथून विद्यमान आमदार आर. टी. देशमुख, मोहन जगताप आणि रमेश आडसकर हे तिघे जण भाजपकडून इच्छुक आहेत. येथे नवीन चेहर्‍याला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. माजलगाव येथे उमेदवारी देताना भाजपला देशमुख, जगताप, आडसकर? यापैकी डावललेल्या दोघांचा रोष पत्करावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके मातब्बर उमेदवार आहेत. 2014 च्या लाटेत त्यांचा पराभव झाला असला तरी 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजलगाव तालुक्यातील सर्वच्या सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणले होते. सोळंके यांना मोहन जगताप चांगली लढत देऊ शकतात. केजमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांना परत संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून केज येथून स्व. विमल मुंदडा यांच्या स्नुषा नमिता मुंदडा निवडणूक लढवणार आहेत. बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सहा मतदार संघांवर पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव आहे. अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून वीस वर्षांत पहिल्यांदाच राष्ट्रवादीची एवढी वाईट अवस्था झाली आहे.