Wed, Aug 12, 2020 00:35होमपेज › Marathwada › हिंगोली : सहाय्यक लेखाधिकाऱ्यास लाच घेताना पकडले

हिंगोली : सहाय्यक लेखाधिकाऱ्यास लाच घेताना पकडले

Last Updated: Jul 14 2020 8:59PM
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव ग्रामपंचायतचा स्वच्छतागृहाचा धनादेश देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कळमनुरी पंचायत समितीच्या सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय शिंदे यास रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. १४ जुलै) सायंकाळी पाच वाजता केली.

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम केले. या बांधकामाचा ३ लाख ८४ हजार रुपयाचा धनादेश पंचायत समितीच्या लेखा विभागाकडून मिळणे बाकी होते. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे मागील सहा महिन्यापासून चकरा मारण्यास सुरुवात केली. वारंवार विनंती करूनही धनादेश दिला जात नव्हता. त्यानंतर सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय शिंदे याने धनादेश देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागितली. 

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपतचे उपाधिक्षक हनुमंत गायकवाड पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, ममता अफूने,  सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बुरकुले, जमादार रुद्रा कबाडे, संतोष दुमाने, अवी कीर्तनकार, विनोद देशमुख, प्रमोद थोरात, ज्ञानेश्वर पंचलिंगे यांच्या पथकाने कळमनुरी पंचायत समितीच्या परिसरात सापळा रचला होता. 
मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सहायक लेखाधिकारी शिंदे याने ७ हजार रुपयांची लाच घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले.