अहमदपूर : प्रतिनिधी
एका समाजाबद्दल एका मित्र मंडळाच्या बैठकीत एका राजकीय व्यक्तीने अपशब्द वापरल्याच्या कारणावरून अहमदपूरमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे. यानंतर संतप्त युवकांनी संबंधित व्यक्तीच्या दुकानावर दगडफेक केल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी अहमदपूरमधील एका बैठकीत संबंधिताने केलेल्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर अहमदपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज बंद पाळण्यात येत आहे. या बंद काळात सकाळी काही युवक संबंधित व्यक्तीच्या दुकानासमोर आले व त्यांनी दुकानावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसाच्या हस्तक्षेपाने परिस्थितीवर नियंत्रण करण्यात आले आहे.
संबंधितावर कारवाई करावी, या मागणीसाठी अहमदपूरमधील शिवाजी चौकात युवकांनी ठिय्या आंदोलनास सुरूवात केली आहे. सुरक्षेच्या कारणावरून सर्व बसेस बसस्थानकात थांबवल्या असून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे शहरात सर्वत्र तणावाचे वातावरण पसरले आहे.