Mon, Apr 12, 2021 02:18
कासार्डेत अवैध सिलिका वाहतूक करणारे ११ ट्रक महसूलकडून ताब्यात

Last Updated: Apr 08 2021 2:04AM

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

कासार्डेतील मायनिंगमध्ये अवैधरीत्या होणार्‍या सिलिका उत्खननावर महसूल विभागाकडून कारवाई एकीकडे सुरूच असताना ग्रामस्थ व महसूलच्या अधिकार्‍यांनी सिलिका वाहतुकीचा परवाना नसलेले पाच व ओव्हरलोड वाहतूक करणारे सहा असे 11 ट्रक ताब्यात घेतले. मायनिंगसंबंधी महसूल विभागाने केलेली ही जिल्ह्यातील मोठी कारवाई आहे. ताब्यात घेतलेले हे ट्रक बुधवारी सायंकाळी कणकवली तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली होती. 

कासार्डे मायनिंग क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर व त्याविषयक नागरिकांमधून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाकडून मोजमाप व चौकशीची प्रक्रिया चालू करण्यात आली होती. गेले काही दिवस महसूल विभागाकडून ही कारवाई मायनिंग क्षेत्रामध्ये सुरू आहे. कणकवली तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, तलाठी, महसूलचे कर्मचारी व कोतवाल यांच्या पथकाकडून मायनिंग क्षेत्रामध्ये उत्खननाची माहिती घेतली जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रृटी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सिलिका ट्रेडिंगचा परवाना नसतानाही काही व्यावसायिक बिनबोभाटपणे मायनिंग क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. मात्र याविषयीचा अंतिम अहवाल महसूल विभागाकडून प्राप्त झालेला नाही. 

एकीकडे महसूल विभागाकडून कासार्डेतील मायनिंग क्षेत्रामध्ये चौकशी व तपासणी सुरू असतानाच दुसरीकडे विनापरवाना व वाहनामध्ये ओव्हरलोड सिलिका भरून ती रात्रीच्या अंधारात लंपास करण्याचा प्रयत्न कासार्डेतील स्थानिक नागरिक व महसूलच्या टीमकडून पर्दापाश करण्यात आला. कासार्डेतील मायनिंग क्षेत्रातून सिलिका घेऊन फोंडाघाटच्या दिशेने जाणारे ट्रक, डंपर बुधवारी पहाटेच्या सुमारास स्थानिक नागरिक व महसूलच्या कर्मचार्‍यांकडून अडविण्यात आले. वाहने अडविल्यानंतर ती रस्त्यातच सोडून चालकांनी पळ काढला होता. यातील काही वाहने ही परजिल्ह्यातील असल्याचे दिसून आले. 

महसूल विभागाकडून बुधवारी सकाळी या सर्व वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाच वाहनांमधून अनधिकृतपणे विनापास वाळू वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले, तर उर्वरित सहा वाहनांमध्ये वाळू ओव्हरलोड भरल्याचे दिसून आले. यामध्ये 1 डंपर, 1 आयशर व 9 ट्रक अशी एकूण 11 वाहने ताब्यात घेण्यात आली. हे सर्व ट्रक, डंपर सायंकाळी तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले व त्यानंतर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असे कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार यांनी सांगितले. या कारवाईत तळेरे मंडळ अधिकारी मंगेश यादव, तलाठी किरण गावडे, कोतवाल दीपक आरेकर, समीर राणे यांनी सहभाग घेतला. 

कासार्डेतील अवैध मायनिंग उत्खननाविषयी चौकशी महसूल विभागाकडून सुरू असताना त्याचा कोणताही परिणाम मायनिंग माफियांवर झालेला दिसून येत नाही. चौकशीची प्रक्रिया सुरू असताना रात्रीच्या अंधारात उत्खनन केलेली सिलिका परजिल्ह्यात लंपास करण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळे महसूल विभागाने या विरोधात अधिक सक्षमपणे धडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.