Sat, Aug 08, 2020 14:39होमपेज › Konkan › कोकणातील नमन, जाखडी उपेक्षितच!

कोकणातील नमन, जाखडी उपेक्षितच!

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 9:56PMचिपळूण : समीर जाधव

कोकणातील लोककला दशावताराला राजाश्रय मिळाला. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात पिढ्यान् पिढ्या प्रसिद्ध असलेली लोककला नमन आणि जाखडी या लोककला  शासन दरबारी उपेक्षित राहिल्या आहेत. जिल्ह्यातील या लोककलाकारांना देखील राजाश्रय मिळावा, अशी अपेक्षा चिपळुणात सध्या सुरू असलेल्या शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या दशावतारी नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने व्यक्‍त होत आहे.

शहरातील पवन तलाव मैदानावर दि. 16 जानेवारीपासून शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने दशावतारी नाट्य महोत्सव सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पारंपरिक कला या निमित्ताने चिपळूण परिसरातील लोकांना पहावयास मिळत आहे. याच पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील नमन आणि जाखडी लोककलांना राजाश्रय मिळावा, अशी अपेक्षा आहे. 

‘रात्री राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा’ अशी एक म्हण सिंधुदुर्गात प्रचलित आहे. दशावतारी कलाकारांची पूर्वी अशी अवस्था होती. मात्र, या रात्रीच्या राजाच्या डोक्यावरील बोजा उतरण्याचे काम शासनाने केले. माजी मुख्यमंत्री ना. नारायण राणे यांनी या लोककलेला राजाश्रय मिळवून दिला. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी त्या द‍ृष्टीने कमी पडत आहेत. 

मध्यंतरी जिल्ह्यात नमन आणि जाखडी कलाकारांना एकत्र करण्याचा प्रयत्न झाला. संदीप सावंत यांनी त्या द‍ृष्टीने नमन महोत्सव भरवून शासनाकडे प्रस्तावही पाठविला. मात्र, अजूनही या कलेला राजदरबारात स्थान मिळालेले नाही. शिमगोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात नमन खेळे सुरू होतात. गण, गौळण आणि वग अशा माध्यमातून हे नमन सादर केले जाते. ग्रामदेवतेच्या जत्रा, सण-उत्सव, लग्‍न अशा ठिकाणी नमन सादर होते. सध्या संगमेश्‍वर तालुक्यातील नमन कलेला मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवात जाखडी हा नृत्य प्रकार सादर केला जातो. शक्‍ती-तुर्‍याच्या माध्यमातून सवाल-जवाब होतात. वर्षानुवर्षे या कला सुरू आहेत. परंतु, हे लोककलाकार दुर्लक्षित राहिले आहेत.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे. जाखडी आणि नमन कला याच समाजातील लोकांनी जोपासल्या आहेत. अलीकडे नोकरी, व्यवसायानिमित्त या समाजातील तरूण बाहेरगावी जाऊ लागल्याने या कलेचा र्‍हास होत  आहे. दशावताराप्रमाणे या कलेचे संवर्धन  होण्यासाठी या कलेला शासन दरबारी स्थान मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील लोककलाकार कोकणचेच असलेले सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडून अपेक्षा व्यक्‍त करीत आहेत.

नमन -जाखडीचा सखोल अभ्यास व्हायला हवा...
नमन आणि जाखडी या लोककलांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. ही कलादेखील शास्त्रशुद्ध आहे. त्याला पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ आहेत आणि पिढ्यानपिढ्या तिचे जतन होत आहे. मात्र, अलीकडे जाखडी आणि नमनामध्ये चौकटीबाहेर जाऊन आधुनिकता आली आहे. त्या नादात या लोककला अश्‍लीलतेच्या मार्गावर जात आहे. हा कलेच्या जतनासाठी धोका आहे. नमन आणि जाखडीमधील ‘अश्‍लीलता’ वगळल्यास या कलेला राजाश्रय मिळेल. त्यामुळे नमन व जाखडी मंडळांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ शाहीर (शक्‍तीवाले) दत्ता आयरे यांनी व्यक्‍त केले.