Sun, Sep 20, 2020 09:34होमपेज › Konkan › महाकाय लाटांचे तांडव

महाकाय लाटांचे तांडव

Last Updated: Jun 02 2020 10:35PM
देवगड (पुढारी वृत्तसेवा) : हवामान विभागाने 4 जूनपर्यंत चक्रीवादळ धडकण्याचा इशारा दिल्याने खोल समुद्रात मच्छिमारीस गेलेल्या सर्व नौका माघारी परतल्या असून वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मच्छिमारही सतर्क झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पडला होता. सिंधुदुर्ग किनार्‍यावर समुद्रात लाटांचे तांडव सुरू होते. 

समुद्रातील मच्छिमारी व्यवसाय बंद झाला; मात्र केंद्र शासनाने 12 नॉटीकल बाहेर 14 जूनपर्यंत मच्छिमारी करण्यास परवानगी दिल्याने काही नौका मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जात होत्या. मात्र, हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिल्याने सर्व नौकांना तत्काळ माघारी बोलविण्यात आले.

खोल समुद्रात असलेल्या नौकांना तटरक्षक दल, मत्स्य व्यवसाय विभागामार्फत सुरक्षेच्या द‍ृष्टीने तत्काळ बंदरात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी देवगड व मालवण तसेच वेंगुर्ले समुद्र किनारपट्टी भागात लाटांचे तांडव होते. समुद्र खवळला होता. वादळसद‍ृश स्थितीमुळे मच्छिमारांनी सतर्कता बाळगून आपल्या नौका किनार्‍यावर काढल्या असून उर्वरित मच्छिमारांनी नौका देवगड बंदरात आणून ठेवल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी देवगड बंदर भागात वार्‍याचा मोठा परिणाम जाणवत नव्हता. तर मिठमुंबरी, कुणकेश्‍वर येथे सोसाट्याच्या वार्‍यामुळे समुद्र खवळला होता. वार्‍यामुळे किनारपट्टी भागात रस्त्यावरून वाहने चालविणेही वाहनचालकांना धोकादायक बनले होते.

देवगड बंदरात बहुतांशी नौका किनार्‍यावर घेण्यात आल्या असून शाकारणीच्या कामांना वेग आला आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे नौका शाकारण्याचा कामात मच्छिमार गुंतले आहेत तर चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर छोट्या नौका व होड्याही किनार्‍यावर घेण्यात आल्या आहेत. देवगड तालुक्यातील समुद्रकिनारे असलेल्या महत्वाच्या पाँईटवर सागर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रतीक महाडवाला यांनी दिली.

किनार्‍यापासून दूर रहा

समुद्रकिनारी धोक्याच्या ठिकाणी जावू नका, समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती मत्स्यव्यवसाय  सहाय्यक परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला यांनी दिली. देवगडमध्ये सोमवारी सकाळपासून पावसाला सुरूवात झाली. वातावरण निवळल्यानंतर नौका मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जातील, अशी शक्यता मच्छिमार नेते भाई खोबरेकर यांनी व्यक्‍त केली. 

 "