Fri, Feb 26, 2021 06:41
प्रांताधिकार्‍यांनी केले चार ट्रक जप्‍त; ५ लाखांचा ठोठावला दंड 

Last Updated: Feb 24 2021 2:31AM

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

विनापरवाना व ओव्हरलोड सिलिका वाळू वाहतूकप्रकरणी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी धडक कारवाई केली. यामध्ये दोन डंपर आणि दोन सिलिका वाळूचे ट्रक ताब्यात घेण्यात आले. सोमवारी सायंकाळी उशिरा कासार्डे येथे ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर चारही वाहने पंचनामे करून कणकवली तहसील कार्यालयासमोर आणण्यात आली होती. विनापरवाना वाळू उपसा आणि वाहतूकप्रकरणी दस्तुरखुद्द प्रांताधिकारी मैदानात उतरल्याने सिलिका वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना सुमारे 5 लाख 18 हजार 625 रु. चा दंड करण्यात आला. 

सोमवारी सायंकाळी महसूलच्या पथकाने संयुक्‍तरीत्या ही कारवाई केली. या कारवाईत प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने, महसूल नायब तहसीलदार एस. व्ही. राठोड, मंडळ अधिकारी मंगेश यादव, संतोष नागावकर, नांदगाव मंडळ अधिकारी व्ही. ए. जाधव, नांदगाव, तळेरे, फोंडाघाट, लोरे तलाठी, कोतवाल या कारवाईत सहभागी झाले होते. गेले काही दिवस कणकवली तालुक्यात कासार्डे भागात अनधिकृत सिलिका वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर सिलिका वाळू वॉशिंगप्रश्नी तालुक्यातील काही सरपंचांनी उपोषणही छेडले होते. या पाश्वभूर्र्मीवर प्रांताधिकार्‍यांनी ही धडक कारवाई केल्याने सिलिका वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून येत्या काळात महसूल विभागाकडून ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याची माहिती महसूलच्या सूत्रांनी दिली.