Mon, Nov 30, 2020 12:55होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : आचऱ्यात पुराने वेढलेल्‍या घरातून विलगीकरणातील २ मुलींची सुखरूप सुटका

सिंधुदुर्ग : आचऱ्यात पुराने वेढलेल्‍या घरातून विलगीकरणातील २ मुलींची सुखरूप सुटका

Last Updated: Jul 09 2020 6:00PM
आचरा : पुढारी वृत्‍तसेवा 

आचरा परिसरात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे बुधवारी सायंकाळी पारवाडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. नदीच्या पुराच्या पाण्याने काही घरांना वेढा घातला. यातच गृह विलगीकरणात असलेल्या दोन मुली नदी किनारी एका घरात अडकल्या होत्या. पारवाडीत पाहणी करण्यासाठी गेलेल्या आचरा गावच्या सरपंच प्रणया टेमकर यांना याची माहिती मिळताच, त्यांनी प्रसंगावधान राखत वेळेत यंत्रणा राबवली. त्या दोन मुलींना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत त्यांचे सुरक्षित घरात विलगिकरण केले. नदीच्या पाण्यात अडकलेल्या आपल्या मुली सुखरूप बाहेर आल्‍याचे पाहून त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला.

आचऱ्यात बुधवारी रात्री पारवाडी नदीचे पाणी आल्‍याने अनेक घरे पाण्यात बुडाली. हे  पाहणी करण्यास आचरा सरपंच टेमकर गेल्या असता, नदी किनारी असलेल्या घरात विलगीकरणात ठेवलेल्‍या  2 मुली अडकल्याचे त्‍यांना समजले. सरपंच टेमकर यांनी तातडीने हालचाल करत याची माहिती आचरा पोलिसांना दिली. तसेच रेस्क्यू बोट पाठवण्यास सांगितले. याची माहिती मिळताच काही वेळात सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर हे घटनास्‍थळी दाखल झाले. 

पारवाडी येथे रेस्क्यू बोट आणल्यानंतर ग्राम पंचायत सदस्य मुज्जफर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू बोट घेऊन दर्शन तारी, वैभव कुमठेकर नितीन तारी, अक्षय वाडेकर रसिक जोशी यांनी बोट पाण्याने वेढलेल्या घराजवळ नेत त्या दोन मुलींना रेस्क्यू बोटमध्ये बसवून ब्राह्मणदेव मंदिरानजिक सुरक्षित ठिकाणी आणले. दोन्ही मुली सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर या दोन्ही मुलींची एका सुरक्षित घरात त्यांचे विलगिकरण करण्यास आले.