Tue, Aug 04, 2020 11:10होमपेज › Konkan › ‘बर्निंग बस’चा थरार

‘बर्निंग बस’चा थरार

Last Updated: Jul 11 2020 1:24AM
संगमेश्‍वर : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्‍वर पारेख पेट्रोल पंप येथे खासगी आराम बस पूर्णतः जळून खाक झाली. बसच्या मागील टायरने अचानक पेट घेतल्याने  काही काळ घटनास्थळी ‘बर्निंग बस’चा थरार निर्माण झाला होता. दरम्यान, सुदैवाने सर्व प्रवासी आराम बसमधून सुरक्षितपणे बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी घडला. यामध्ये बस पूर्णत: जळून खाक झाली असून प्रवाशांचे सर्व साहित्यही जळून गेल्याने सुमारे तीस लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. 

विरारहून देवगडला जाणारी खासगी आराम बस (एमएच-04 एच वाय 6010) बावीस प्रवाशांना घेऊन चालक धावू नानू बोडके (वय 35, रा . विरार) हा गुरुवारी रात्री विरारहून देवगड येथे जाण्यासाठी निघाला होता. गुरुवारी रात्री कशेडी घाटात दरड कोसळल्याने आराम बस दोन तासांपेक्षा अधिक काळ कशेडीतच रखडली होती. ही बस धामणी संगमेश्वर येथे येताच बसच्या मागील चाकाला आग लागली. अशा स्थितीतच बस पुढे धावत असल्याने आग अधिक भडकत गेली. दरम्यान, मागून येणार्‍या एका इनोव्हा चालकाने बसला आग लागल्याचे सांगितल्यावर बस चालक धावू बोडके याने बस थांबवली. याचवेळी  गांभीर्य ओळखून बसमधील सर्व 22 प्रवाशांना तातडीने बसबाहेर काढण्यात आले.  दरम्यान, बस वेगाने पेटू लागताच मापारी मोहल्ला, रामपेठ येथील तरुणांनी तातडीने पाण्याची व्यवस्था केली.  मात्र, आग भडकल्याने बस प्रवाशांच्या सामानासह जळून खाक झाली. संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक उदयकुमार झावरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विभुते, हे. कॉ. कोष्टी, कॉ. कामेरकर आदी घटनास्थळी दाखल झाले.  रत्नागिरी येथून फायर ब्रिगेडलाही पाचारण करण्यात आले. मात्र प्रवाशांच्या सर्व सामानासह बस जळून खाक झाली. या दुर्घटनेत 30 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.