Tue, Mar 02, 2021 09:39
एकाच दिवसात ३९७ जणांवर कारवाई; ८० हजार दंड वसूल

Last Updated: Feb 24 2021 2:31AM

सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोव्हिडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवसात 397 व्यक्‍तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 79 हजार 400 रु. दंड वसूल करण्यात आला.

यामध्ये महसूल विभागाने 41 व्यक्‍तींवर कारवाई करत एकूण 8 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला तर पोलिसांनी 176 व्यक्‍तींवर कारवाई करत एकूण 35 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. नगर पालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक 180 व्यक्‍ती या विनामास्क आढळून आल्या. त्यांच्याकडून एकूण 36 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्‍कम  79 हजार 400 रुपये इतकी आहे.

त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलिस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण 126 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 14 ठिकाणी कोव्हिडच्या नियमांचे उल्‍लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये 4 रेस्टॉरंटचाही समावेश आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोव्हिडच्या नियमांचे पालन करावे, तसेच मास्क, हॅन्ड सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.