Mon, Apr 12, 2021 03:56
कोरोना टेस्टशिवाय जिल्ह्यात प्रवेश नाही

Last Updated: Apr 08 2021 2:04AM

सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात  गेल्या सहा महिन्यांनंतर  बुधवारी पहिल्यांदाच शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व मृत्यूचा आकडा पाहता सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाने दिलेले निर्देश तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. परजिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात यायचे झाल्यास आरटीपीसीआर टेस्ट करूनच जिल्ह्यात यावे, असे सांगतानाच गर्दीच्या ठिकाणी न जाता घरी राहूनच आगामी येणारे सण साजरे करा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत केले. 

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाल्या, गेल्या सहा महिन्यात बुधवारी पहिल्यांदाच 117 रुग्ण आढळून आले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची टक्केवारी 10 टक्के एवढी आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. मंगळवारी एका दिवसात 11 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

टेस्टिंगची मर्यादा 950 पेक्षा जास्त करण्यात आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता मिनी लॉकडाऊन च्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक बनले आहे. प्रत्येक नागरिकांनी आपापली जबाबदारी घ्यावयाची आहे. मुख्य सचिवांनी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या 287 बेड्स उपलब्ध आहेत. तर जिल्ह्यात आरोग्य संस्थांमध्ये 653 बेड्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी असणार्‍या रुग्णांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. होम आयसोलेशन मध्ये असणार्‍या रुग्णांची रोज फोन द्वारे चौकशी केली जात आहे. तसेच घरी जाऊन विझिट केली जात आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता शॉप्स बंद करायचे आहेत. रात्रीची संचारबंदी आहे.या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचा भंग करणार्‍यां विराधात कारवाई केली जाईल. 

जिल्ह्यातील व्यापारी, लग्न समारंभातील मंडळी, कॅटरिन, हॉटेल व्यावसायिक यांनी जवळच्या शासकीय संस्थेत जाऊन कोरोना टेस्ट करून घ्यावी. शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. आठवडा बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. ऑटोरिक्षा(अत्यावश्यक सेवेसाठी),बस किंवा इतर प्रवासी वाहतूक अविरत सुरू राहील असेही जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात येण्यासाठी कोरोना टेस्ट आवश्यक

बाहेरून येणार्‍या नागरिकांना आरटीपीसीआर करणे आवश्यक आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणार्‍यांना व परत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या नागरिकांनी कोरोना टेस्ट करणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये टेस्टिंगची सुविधा मोफत असणार आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सर्वांचे सहकार्य अपेक्षित राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.या महिन्यात गुडीपाडवा, महावीर जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण येत आहेत. हे सण प्रत्येकाने घरीच राहून साजरे करावे. प्रत्येकानं मास्क लावून, सोशल डिस्टनसिंग ठेऊन नियम पाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.