Fri, Feb 26, 2021 06:29
रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

Last Updated: Feb 24 2021 2:31AM

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे व दिवसेंदिवस कोरोना विषाणूने बाधित व्यक्तींच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. मंगळवारी रात्रीपासून रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून, मास्क न वापरणार्‍यास पाचशे रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात होत असणार्‍या विविध क्रीडा स्पर्धा विशेषत: कबड्डी, क्रिकेट, खो-खो, इत्यादींना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. स्थानिक प्राधिकार्‍याच्या परवानगीशिवाय आठवडा बाजार, जनावरांचे बाजार भरवण्यास मनाई आहे. कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक, धार्मिक समारंभ साखरपुडा, मुंज, पूजा, आरती, नमाज इत्यादी ज्यामध्ये 50 च्या 
मर्यादेपर्यंत लोक एकत्रित येण्याची शक्यता आहे, अशा कार्यक्रमांना प्रांताधिकार्‍यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. उद्याने, मोकळ्या जागा, मनोरंजन पार्क, क्रीडांगणे, समुद्र किनारे अशा ठिकाणी एकाचवेळी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास जिल्हाधिकार्‍यांनी मज्जाव केला आहे.

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे अटी, शर्तींवर खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, यात्रा, जत्रा, ऊरुस यांमधील फक्त धार्मिक विधी करण्यास 50 माणसांच्या मर्यादेत परवानगी देण्यात आली आहे. यासाठी प्रांताधिकार्‍यांची परवानगी लागणार आहे. तसेच जिल्ह्यात विनापरवाना जत्रा, यात्रा, ऊरुस भरविण्यास मनाई करण्यात आली आहे.

संचारबंदी लागू करण्यात आली असून कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. यामधून अत्यावश्यक सेवेकरिता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्याच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा देण्यात आली आहे. या  वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

...तर कठोर कारवाई

जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, सर्व आस्थापना, सर्व समारंभ व कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. केवळ मास्क जवळ बाळगून त्याचा वापर न करणे किंवा योग्य रितीने वापर न करणे या बाबीसुद्धा मास्कचा वापर न करणे याप्रमाणे समजण्यात येईल. मास्क न वापरल्यास 500  रुपये दंड आणि प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत.