सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचार्याचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गेले 15 दिवस पसार असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांना अटक करण्यात अखेर सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले आहे.
शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस ठाण्यात या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कामात असलेल्या एका महिला कर्मचार्यांनी विनयभंग केला असल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्यावर 22 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या नजरेआड असलेल्या डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या सुनावणीत 26 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्यांना 6 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. दरम्यान 6 रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली होती. मात्र, निकाल राखून ठेवण्यात आला होता. प्रथमदर्शनी डॉ.चव्हाण हे दोषी असल्याचे आढळून येत असल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे आदेश 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाकडून देण्यात आले.त्यानंतर डॉ.चव्हाण यांनी आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विनंती अर्ज केला होता. मात्र, हा अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे डॉ. चव्हाण यांच्या शोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस होते. बुधवारी
डॉ. चव्हाण यांना जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सोळंकी तसेच सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर शिताफिने ताब्यात घेण्यात सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती या प्रकरणाच्या तपासी अंमलदार गायत्री पाटील यांनी दिली. डॉ.चव्हाण यांना गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
चव्हाण यांना कडक शिक्षा व्हावी : सौ. पडते
स्वतःकडे असलेल्या अधिकाराचा गैरवापर करून महिला कर्मचार्याला त्रास देणे आपल्या जिल्ह्याची संस्कृती नाही. श्रीमंत चव्हाण यांनी असे कृत्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. जामीन नाकारून न्यायालयानेही त्यांना फटकारले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केलीच आहे. ही चांगली बाब आहे. यापुढे योग्य तपास करून चव्हाण यांना शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा या प्रकरणात पीडित महिलेच्या बाजूने उभ्या राहणार्या माजी जि. प. अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांनी व्यक्त केली आहे.