Thu, Nov 26, 2020 21:12होमपेज › Konkan › कनिका रावराणे यांना सैन्य दलात लेफ्टनंट पदावर बढती

कनिका रावराणे यांना सैन्य दलात लेफ्टनंट पदावर बढती

Last Updated: Nov 23 2020 12:07AM

शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी कनिका कौस्तुभ रावराणेवैभववाडी : पुढारी वृत्तसेवा

जम्मू-काश्मीर येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले वैभववाडी तालुक्यातील सडूरे गावचे सुपुत्र मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी कनिका कौस्तुभ रावराणे या भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर बढती मिळाली आहे. शनिवारी 21 नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 

कनिका रावराणे यांनी पती कौस्तुभ रावराणे शहीद झाल्यानंतर  गेल्यावर्षी सैन्यदलाच्या परीक्षेत पास झाल्या. त्यानंतर चेन्‍नई येथे अधिकारी प्रशिक्षण अकादमीत दाखल झाल्या होत्या. तेथे त्यांनी नऊ महिने कठोर परिश्रम घेऊन खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. शनिवारी त्यांची नियुक्‍ती लेफ्टनंट पदावर झाली आहे. लेफ्टनंट पदाचे दोन स्टार त्यांना मिळाले आहेत. मेजर कौस्तुभ रावराणे हे ऑगस्ट 2018 रोजी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर  कोसळला होता. अशा  महाभयंकर संकटातही न डगमगता पतीचे अर्धवट राहिलेले देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय बाळगून  त्यांनी आपणही सैन्य दलात भरती होण्याचे ठरविले. त्यानंतर  कनिका रावराणे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला. खासगी नोकरी सोडून सैन्यदलाची परीक्षा त्या पास झाल्या. प्रशिक्षण पूर्ण करून त्या सैन्यदलात भरती झाल्या आहेत. त्यांना 2 वर्षांचा मुलगा आहे.त्यांना रावराणे कुटुंबातील सर्वांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. कनिका रावराणे लेफ्टनंट पदावर रुजू झाल्याने वैभववाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांच्या निवडीने  वैभववाडी तालुक्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.