Thu, Oct 29, 2020 07:05होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात ‘हाय अ‍ॅलर्ट’

रत्नागिरी जिल्ह्यात ‘हाय अ‍ॅलर्ट’

Last Updated: Jun 02 2020 10:48PM
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ 3 जून रोजी धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘हाय अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.  जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली असून अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातही सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. एनडीआरएफ, कोस्टगार्डसह सर्व यंत्रणा या वादळावर लक्ष ठेवून राहिल्या आहेत. जिल्ह्यातील सुमारे 5 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे.

संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर प्रवासावरही बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात मंडणगड ते गुहागर दरम्यान वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याच्या शक्यतेने प्रशासनाने एनडीआरएफची आणखी एक टीम मागवली आहे. ही टीम मंडणगड येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत वीजपुरवठाही खंडित केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनाराण मिश्रा यांनी स्पष्ट केले. आपत्ती व्यवस्थापन पथकासह सर्व नागरिकांनीही अ‍ॅलर्ट राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

‘निसर्ग’ चक्री वादळ हे रायगड किनारपट्टीवर सरकले आहे. विशेषत: मुरुडला बसणारा फटका आता अलिबागच्या दिशेने सरकला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला याचा फटका कमी बसण्याची शक्यता आहे. परंतु, गुहागर ते मंडणगडपर्यंत वादळाचा सर्वाधिक तडाखा अधिक बसणार आहे. मंडणगड तालुक्यातील वेस्वी, बाणकोट, वेळाससह दापोली तालुक्यातील 23 गावे व गुहागरमधील काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा रत्नागिरी व राजापूर या तालुक्यांना कमी फटका बसेल, अशी आशा जिल्हाधिकारी  मिश्रा यांनी व्यक्‍त केली.

मंडणगड धोका असणार्‍या गावांमधील नागरिकांना अन्यत्र शिफ्टींग केले जात आहे. आतापर्यंत 1248 नागरिकांना हलवण्यात आले आहे. दापोलीतील 235 तर गुहागरमधील 1196 लोकांना हलवण्यात आले आहे. दापोली व गुहागरमधील आणखी काही नागरिकांना रात्रीपर्यत हलवले जाणार आहे.  बुधवारी सायंकाळीपर्यंत 2700 नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आले आहे.  नागरिकांनी आपले पशुधन व पाळीव प्राणी सुरक्षितस्थळी हलवावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. 

चक्रीवादळ पहाटे पाच वाजल्यापासून जमिनीच्या दिशेने सरकणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका सकाळी 9 ते 12च्या दरम्यान, असणार आहे. या कालावधीत वीज पूरवठा खंडीत ठेवला जाणार आहे. आत्यवश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कंपन्यांना एक दिवस स्टॅण्डबाय मोडमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धरणांच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांनाही सतर्क करण्यात आले आहे.

मंडणगडमध्ये सर्वाधिक फटका बसू शकतो हे लक्षात घेऊन आणखी एक एनडीआरएफची टीम बोलावण्यात आली आहे. ही टीम  मंडणगडमध्ये ठेवली जाणार आहे. या टीमच्या मदतीला ग्रामकृती दले, नगर परिषद व महसूलमधील आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी, रेस्क्यू ऑपरेशन करणार्‍या टीम यांनाही सोबतीला घेण्यात आले आहे.

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वैद्यकीय पथक, औषधसाठा तयार ठेवण्यात आला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. 

चिपळूण, राजापूर व खेड येथील नगर पालिकेकडे असणार्‍या बोटीही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. काही मच्छीमारांच्या बोटीही घेतल्या जाणार आहेत. आपत्ती मोठी असेल व रुग्णवाहिकांची संख्या कमी पडल्यास कोणत्याही गाड्या ताब्यात घेण्यासाठी तहसीलदारांना अधिकार देण्यात आले आहेत.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्यकार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदी उपस्थित होते.

आज संचारबंदी

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीनजीक निसर्ग चक्रीवादळ 3 जून रोजी पोहोचणार असल्याने संपूर्ण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातही प्रवास करण्यात बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून दि. 3 जून रोजी लोकांना त्यांच्या अत्यावश्यक सेवाविषयक बाबींसाठी वगळून अन्य कोणत्याही गोष्टीसाठी जिल्ह्यात एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी संचार करण्यास बंदी आहे. संचारबंदीचा हा आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 34 प्रमाणे जिल्हाधिकारी यांनी काढला आहे.

मंडणगडमधील चार गावांना सुरक्षितस्थळी स्थलांतराचे आदेश

मंडणगड : पुढारी वृत्तसेवा
‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंडणगड तालुक्यातील वेळास, बाणकोट, वाल्मिकीनगर  या चार गावांमधील सुमारे 2500 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश मंगळवारी सकाळी देण्यात आले. ही चार गावे अरबी समुद्र व सावित्री नदी किनार्‍यालगतची आहेत. आपत्ती आल्याने हानी पोहोचू शकते, अशा चार गावांतील विविध वाड्यांमधील लोकांना प्रशासनाकडून बाणकोट बलदेववाडी येथील जि.प. शाळा येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे. वेळास येथील 713, वेळास नारायण नगर 466, वाल्मिकीनगर 800, बाणकोट 500 नााागरिकांना बलदेववाडी येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कार्यरत झाल्याची माहिती मंडणगड तहसील कार्यालयातून देण्यात आली. मंगळवार व बुधवार या दोन दिवसांतील सुमारे चोवीस तास धोक्याचे असल्याने प्रशासन गतिमान झाले आहे. 

आपत्ती व्यवस्थापनाकरिता तालुक्यातील 109 गावांमध्ये 69 कर्मचारी कार्यरत करण्यात आले आहेत.  त्यामध्ये 36 ग्रामसेवक, 16 तलाठी, 17  कृषी सहाय्यक यांच्यासह बांधकाम विभाग, पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड शहरात अत्यावश्यक सेवा वगळता मंडणगड बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मंगळवारी सांयकाळी उशिरापर्यंत एनडीआरएफच्या 11 जवानांची तुकडी तालुक्यात दाखल होणार आहे.

 "