रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींच्या 915 जागांसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. यासाठी गेल्या दहा दिवसांपासून जाहीर प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांनी गावागावांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जाहीर प्रचाराचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. रात्री 12 वाजता प्रचार संपला आहे. दरम्यान, मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणेची लगीनघाई सुरू झाली आहे.
एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली. त्यातील 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 360 गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींमध्ये 3921 जागांसाठी तब्बल 7 हजार 194 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 1 हजार 49 जणांनी माघार घेतली आहे. 4338 उमेदवार सध्या रणांगणात उभे आहेत.
गावागावांत 5 जानेवारीपासून जाहीर प्रचारास प्रारंभ झालेला आहे. या प्रचाराच्या धुराळ्याने ऐन थंडीच्या दिवसांत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जाहीर सभा, उमेदवारांच्या प्रचारफेर्यांमुळे वातावरण निवडणूकमय झालेले आहे. बुधवारी रात्री 12 वाजताजाहीरप्रचारथंडावला असून, त्यानंतर वैयक्तिक भेटीगाठींवर उमेदवारांचा भर असणार आहे.
15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेची धावपळ सुरू आहे. एका मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई अशा पाच कर्मचार्यांची नियुक्ती केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रात आरोग्य कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करणार आहेत. त्यानंतर सॅनिटायझर केल्यानंतर मतदाराला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे.
आतापर्यंत दोन प्रशिक्षण दिले आहे. तिसरे प्रशिक्षण गुरूवारी सकाळी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात दिले जाणार आहे. प्रशिक्षण संपल्यानंतर मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांच्या गावी बसद्वारे मुक्कामी रवाना होणार आहेत. निवडणूक अधिकारी व कर्मचार्यांना मतदान केंद्रस्थळी पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस आणि खासगी जीपची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून आतापर्यंत जिल्हाभरात आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.