Sat, Aug 15, 2020 16:34होमपेज › Konkan › आंबोलीत ४० दिवस लॉकडाऊन; पर्यटकांना बंदी  (video)

आंबोलीत ४० दिवस लॉकडाऊन; पर्यटकांना बंदी  (video)

Last Updated: Aug 01 2020 5:51PM

संतोष पालेकर, ग्रा. प. सदस्य, आंबोलीआंबोली : पुढारी वृत्तसेवा 

आंबोली परिसरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवे नियम तथा नियोजन ग्रामस्थ, गावसमिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे  ७ सप्टेंबर (सुमारे ४० दिवस) पर्यंत आंबोली गावात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, बाजारपेठ व आदी पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच गावाबाहेरील व्यक्तींनाही गावात येण्यास पूर्णतः मज्जाव करण्यात आला आहे. तर गणेश चतुर्थी सणाला येणाऱ्या चाकरमान्यानी ७ ऑगस्टपूर्वी गावी येऊन शासनाच्या नियमानुसार क्वारंटाईनचे नियम काटेकोर पाळावे. तसेच संभाव्य कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष नियोजनही करण्यात आले असून तसा ठराव देखील घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर गणेश चतुर्थी सणदेखील काही दिवसांवर आलेला असून येत्या काही दिवसात चाकरमानी देखील आपल्या गावोगावी मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. तसेच आंबोली गावाजवळच्या गावांमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तसेच राज्यासह, कर्नाटक व गोवा यांना जोडणारा महत्वाचा आंबोली घाटमार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात येथून लॉकडाऊन असतानाही वाहतूक होत असते. यामुळे येथील संभाव्य कोरोना संसर्गाचा धोका पाहता खबरदारी म्हणून सोमवारी (ता. २७) आंबोली ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांसह, सर्व पक्षीय व प्रशानाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक झाली. यावेळी आंबोली परिसरातील ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच संबंधित समिती व तलाटी यांच्या आजवरच्या कोरोना महामारीतील कामगिरीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

वाचा : हिंगोली दूध आंदोलन; आमदार मुटकुळेंना अटक

आजवर आंबोली गावात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र सध्या आंबोली परिसराला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गावा - गावांमध्ये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी नजीकच्या सावंतवाडी शहरातदेखील कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने आंबोली परिसरात देखील कोरोनाचा धोका वाढला आहे. तसेच गणेश चतुर्थीला आंबोलीसह इतर गावात परजिल्ह्यातून आणि राज्यातून येणारे चाकरमानी पाहता कोरोनाचा संसर्ग आंबोली परिसरात होऊ नये यासाठी सदर विशेष सभा आंबोली ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आली. या सभेत कोरोना संसर्ग येथे टाळण्यासाठी नवे नियम व नियमावली तयार करुन तसा ठराव सर्व सहमतीने घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत आपल्या अधिकाराखाली नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यावर देखील चर्चा करुन आवश्यक त्या तरतुदी  करण्यात आल्या. यावेळी  उपसरपंच विलास गावडे, ग्रामविकास अधिकारी रातीलाल बहिरम, भाजपा ग्रा. प. सदस्य तथा माजी सरपंच गजानन (बाळा) पालेकर, ग्रा. प. सदस्य संतोष पालेकर सदस्या अक्षता गावडे, छाया सुनील नार्वेकर, प्रियांका जाधव, आंबोली तलाटी श्री. डवरे, पोलिस पाटील विद्या चव्हाण, कृषी अधिकारी सुजाता पाटील, ज्येष्ठ गावकार तथा शिवसेना विभागीय अध्यक्ष शशिकांत सोनू गावडे, ज्येष्ठ गावकार श्री. गावडे, जि. प. चे आंबोली केंद्र प्रमुख आर. बी. गावडे, आंबोली हायस्कूल अध्यक्ष प्रकाश गावडे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संदेश पारकर यांना कोरोनाचा संसर्ग 

शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यापूर्वी त्यांचा आंबोली येथे एक कार्यक्रम झाला होता. यावेळी येथील अनेक शिवसेना कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ हे त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे येथे कोरोना संसर्गाचा धक्का सर्वानीच घेतला. आता खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कातील स्थानिक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अशा संभाव्य धोक्यामुळे येथे सर्व प्रकारच्या राजकीय कार्यक्रमांना पूर्णता बंदी असावी अशी मागणी होत आहे. तसेच जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील कोरोना संसर्ग आलेल्या परिसरातून आंबोली पर्यटनस्थळ बंद अतानाही अनेक पर्यटक बिनधास्त येथे येत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका पाहता सुद्धा उपाय योजनांसाठी सदर विशेष सभा आंबोली ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आली.

वाचा : पुणे- दूध दरवाढीसाठी किसान सभेचे आंदोलन (video)

आंबोलीत ७ सप्टेंबरपर्यंत हे बंद राहील

१) अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद
 २) आंबोलीतील सर्व हाॅटेल्स, लॉज, रेस्टॉरंट व आदी बंद
३) आंबोली गाव वगळता जिल्हा, परजिल्हा किंवा परराज्यातून येणाऱ्या सर्व पर्यटक व व्यक्तींसाठी आंबोलीत पुर्णतः बंदी
४) आंबोली बाजारपेठ बंद ( गणेश चतुर्थी काळात स्थानिकांना खरेदीसाठी काही प्रमानात सूट देण्याचा विचार चालू )
५) विना कारण फिरताना कोणी आढळ्यास कारवाई
६) राजकीय व राजकीय पुरस्कृत कार्यक्रमांना बंदी
७) गावा बाहेरील व्यक्तींना गावात प्रवास व राहण्यास मज्जाव
८)  नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

चाकरमान्यासाठी खालील नियमावली 

१) ज्या चाकरमान्याची स्वतंत्र होम क्वारंटाईन होण्यास सुविधा उपलब्ध नसल्यास त्यांना व त्यांच्या घरातील अन्य कुटुंबातील सदस्यांना देखील १४ दिवस  होम क्वारंटाईन राहवे लागेल.
२) स्वत्रंत्र पेड क्वारंटाईन सुविधा ही उपलब्ध
३) पेड किंवा होम क्वारंटाईन राहणे शक्य नसलेल्या चाकरमान्यासाठी शाळांमध्ये सुद्धा क्वारंटाईनची सुविधा
४) गणेश चतुर्थी दरम्यान दोन - तीन दिवसासाठी जरी कोणी गावा बाहेरची व्यक्ती व चाकरमानी गावात आल्यास 'त्या' कुटुंबाला १४ दिवसांचे क्वारंटाईनचे नियम पाळावे लागतील
६) प्रशासनाची परवानगी घेऊन गावात दाखल होण्याआधी ग्रामपंचायत व संबंधित समितीला पूर्व कल्पना देने बंधनकारक आदी. 

गावातील लोकांसाठी मार्गदर्शनीय नियमावली

१) प्रशानाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन
२) सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे
३) मास्क नियमित वापरणे
४) गणेश चतुर्थी सणाच्या काळात बाहेरील व्यक्तींचा संपर्क टाळणे
५) अति आवश्यक असल्यास गावा बाहेर प्रवास करणे
६) सोशल डिस्टंन्स पाळणे
७) गणेश चतुर्थी काळात विशेष काळजी घेणे
८) विसर्जन स्थळी गर्दी करू नये
९) गणेश चतुर्थी काळात वाडीनिहाय काळजी घेऊन आरत्या व भजन करावे
१०) ज्या कुटुंबातून बाहेरील व्यक्ती गावात येणार त्या कुटुंबातील गावातील व्यक्तीने ग्रामपंचायतला कल्पना द्यावी