Wed, May 19, 2021 04:07
जिल्हाधिकारी बदली बनावट आदेश संशयितास अटक

Last Updated: May 05 2021 2:24AM

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

शासनाच्या बनावट डिजिटल सहीचा  वापर करत तीन अधिकार्‍यांच्या बदलीचा खोटा आदेश तयार करून तो व्हॉटस्अ‍ॅपद्वारे प्रसारित केल्याप्रकरणी संशयित अर्जुन  शामराव संकपाळ  (29, रा. उपवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याला कोल्हापूर येथून अटक करण्यात आली. ही घटना रविवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली झाल्याची बातमी याच बनावट आदेशाचा आधार घेत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली होती.

अर्जुन शामराव संकपाळ असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार संशयिताने गुन्हेगारी हेतूने महाराष्ट्र शासनाचे उपसचिव स. री. बांदेकर-देशमुख यांच्या नावाने बनावट डीजिटल सहीचा वापर करीत तीन अधिकार्‍यांच्या बदलीचा खोटा आदेश तयार केला. त्यानंतर तो बनावट आदेश सोशल मीडिया वर प्रसारित करून संबंधित अधिकारी आणि जनतेची दिशाभूल केली होती. जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीशी संबंधित हा आदेश असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.या प्रकारणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अर्जुन संकपाळला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची 15 हजार रुपयांच्या जमिनावर मुक्‍तता केली.